सणासुदीत चेह-यावर तजेलपणा यावा यासाठी सध्या युट्यूबर्स इन्फ्लूएन्सर्सकडून प्रभावित होऊन तरुण मुलींमध्ये वापरल्या जाणा-या सौंदर्यप्रसाधनांवर त्वचारोगतज्ज्ञांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. युट्यूबर्स एन्फ्लूएन्सर्सकडून सर्रास वापरल्या जाणा-या क्रिममध्ये स्टॅरोईडचे प्रमाण वाढले असून, या प्रभावामुळे मुली ब-याच प्रमाणात चेह-यावर अनावधानाने तजेलपणा येण्यासाठी स्टेरॉइड्स वापरत असल्याचे निरीक्षण त्वचारोगतज्ज्ञांनी नोंदवले आहे.
दिवाळी किंवा इतर भारतीय सणांच्यावेळी मेकअप कसा करावा, यासाठी तरुणमुली मोठ्या प्रमाणात युट्यूबर्स मेकअप इन्फ्लूनसर्सचे व्हिडिओ पाहून मेकअप आणि त्वचेची निगराणी राखणारे क्रीम्स आणि सीरम वापरत आहेत. त्यापैकी सीरम या स्कीन केअर उत्पादनांनी गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात बाजारात नफा कमावला आहे. यात क जीवनसत्तव, हायलरॉनिक एसिड, रेनिनॉल, नायसिनेमाईन हे सीरम तज्ज्ञांचा सल्ला न घेताच तरुणी वापरु लागल्या आहेत. प्रत्येक सीरम त्वचेच्या प्रकारानुसार संबंधितांना सुचवली जाते. मुळात सीरमपेक्षाही आम्ही फार्मा कंपन्यांची निर्मिती असलेले उत्पादने त्वचेवरील समस्यांवर सूचवतो, अशी माहिती वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयाच्या त्वचारोग विभागाचे डॉक्टर किरण गोडसे यांनी सांगितले. मात्र त्याहीपेक्षा सौंदर्यप्रसाधनात क्रीम्स म्हणून वापरले जाणारे स्टेरॉईड्स धोकादायक असल्याचे डॉक्टर गोडसे म्हणाले.
( हेही वाचा: WhatsApp Down: युजर्स ‘मेटा’कुटीला आल्यानंतर WhatsApp ची सेवा सुरू )
तरुणींनी हे क्रीम वापरणे तातडीने बंद करावे
गेल्या काही दिवसांत बेनटाईड नामक क्रीम वापरल्याने कित्येक तरुणींची त्वचा खराब होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे डॉक्टर गोडसे म्हणाले. मुळात हे स्टेरॉईड आहे. कित्येक युट्यूब इन्प्लूएन्सर्स हे क्रीम सौंदर्यप्रसाधन क्रीममध्ये वापरतात. क्रीम वापरल्यानंतर पिंपल्स येणे, त्वचा रखरखीत किंवा खराब होण्यासारखे प्रकार दिसून येत आहेत. तरुणींनी हे क्रीम वापरणे तातडीने बंद करावे, असे आवाहन डॉक्टर गोडसे यांनी दिले. तुमची त्वचा खुलण्यासाठी, त्वचा विकारांपासून दूर राहण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही क्रीम किंवा सीरम थेट वापरु नका, असेही आवाहन डॉक्टर गोडसे यांनी केले.