भुवयांचे (eyebrows) सौंदर्य चेहऱ्याच्या सौंदर्यातही (Beauty Tips) भर घालते. भुवया दाट करण्यासाठी मायक्रोब्लेडिंग आणि लॅमिनेशन यांसारख्या महागड्या ट्रिटमेंट्स करून घेतात; परंतु या महागड्या ट्रिटमेंट्सचे काही तोटे देखील आहेत. काही वेळा या ट्रिटमेंट्स सगळ्यांच्याच त्वचेला सूट होतील अशा नसतात. पण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसा खर्च करण्याऐवजी घरगुती उपाय करूनही आपण आपले आयब्रो नैसर्गिक पद्धतीने भरीव व दाट होऊ शकतात.
भुवया जाड व भरीव करण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्स करण्यापेक्षा रोजच्या वापरातील खोबरेल तेल व कलौंजीचा वापर करू भुवया अधिक आकर्षक बनवता येऊ शकतात. भुवयांना दाटपणा येण्यासाठी खोबरेल तेल व कलौंजीचा वापर नेमका कसा करावा ते जाणून घेऊया –
भुवयांचे केस पातळ का होतात ?
भुवयांचे केस पातळ होण्यामागे अनेक कारण असू शकतात. काहीवेळा ओव्हर प्लकिंगमुळे भुवया पातळ होऊ लागतात. अनुवंशिकता, संसर्ग किंवा त्वचेच्या कोणत्याही गंभीर स्थितीमुळे अनेक महिलांच्या भुवया खराब होतात. त्याचबरोबर तणाव आणि चिंता यामुळे देखील भुवयांचे केस गळतात.
भुवया दाट करण्यासाठी खोबरेल तेल कसे लावाल ?
थोडेसे खोबरेल तेल घेऊन ते कोमट गरम करुन घ्यावे. गरम केल्यानंतर हे खोबरेल तेल कापसाच्या मदतीने भुवयांवर लावावे. गरम लेप भुवयांवर लावताना भुवयांच्या केसांच्या वाढीच्याच दिशेने शक्यतो कापूस फिरवावा. भुवयांच्या अगदी वर आणि खाली त्वचेला देखील तेल लावावे. त्यानंतर बोटांनी हलकेच मसाज करून घ्यावा. रात्रभर हे तेल भुवयांवर तसेच लावून ठेवावे. सकाळी वाईप्सने पुसून मग चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
भुवया दाट होण्यासाठी खोबरेल तेलाचे फायदे
खोबरेल तेल भुवयांच्या केसांच्या वाढीस आणि अधिक भरीव करण्यास मदत करते. नारळाच्या तेलामध्ये मॉइश्चरायझिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे आपल्या भुवयांना निरोगी ठेवण्यासाठी ओलावा आणि पोषण देतात. याशिवाय, खोबरेल तेलात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म देखील आहेत की ते कोणत्याही प्रकारच्या संसर्गास प्रतिबंध करून डोळ्यांच्या भुवया वाढविण्यात मदत करतात.
भुवया दाट करण्यासाठी कलौंजीचा वापर कसा करावा ?
कलौंजीच्या बियांची बारीक पूड करुन घ्यावी. एका बाऊलमध्ये ही बारीक केलेली पूड घेऊन त्यात ऑलिव्ह ऑईल व ताजा कोरफडीचा गर घालून हे मिश्रण मिक्स करुन घ्यावे. आता सर्वात आधी एक सुती कपडा पाण्यांत भिजवून त्याने आपल्या भुवया स्वच्छ पुसून घ्याव्यात. त्यानंतर हा कलौंजीचा पॅक हलक्या बोटांनी भुवयांवर पसरवून लावावा. २० मिनिटे हा पॅक भुवयांवर असाच राहू द्यावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. चेहरा धुतल्यानंतर बोटावर ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घेऊन त्याने आयब्रोला २ ते ३ मिनिटे मसाज करुन घ्यावा. ऑलिव्ह ऑईल व खोबरेल तेलाच्या वापराने भुवयांच्या भागातील ब्लड सर्क्युलेशन चांगले होऊन भुवयांचे केस वाढण्यास तसेच भरीव होण्यास मदत होते.
कलौंजीचे फायदे
कलौंजीमध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे केसांना फायदा होतो. यामुळे भुवयांचे केस दाट होतात. पांढऱ्या केसांसाठी कलौंजीचा पॅकही गुणकारी ठरतो. यामुळे गळणारे आणि पातळ केस भरीव आणि दाट व्हायला मदत होते.