-
ऋजुता लुकतुके
शुक्रवारी (२८ मार्च) शेअर बाजारातील व्यवहाराचा आठवड्याचा शेवटचा दिवस असताना अचानक बातमी आली की, बंगळुरू मेट्रो प्रकल्पाने बीईएमएल कंपनीला एक मोठं कंत्राट दिलं आहे. हे कंत्राटही ४०५ कोटी रुपयाचं आहे. ही सकारात्मक बातमी आल्यानंतर दिवसभर या शेअरची चलती राहिली. शेअर जवळ जवळ ३ टक्क्यांनी वधारून ३,२३० पर्यंत चढला. यात दिवसभरात ८९.६० अंशांची वाढ झाली. बंगळुरू मेट्रोसाठी लागणाऱ्या डब्यांची निर्मिती, पुरवठा आणि डब्यांची प्रत्यक्ष जोडणी अशी सर्व कामं बीईएमएललाच करायची आहेत. हा प्रकल्पही काही वर्ष चालणारा असेल. त्यामुळे शेअरवर गुंतवणूकदारांचं लक्ष गेलं नसतं तरंच नवल. (BEML Share Price)
तसाही मागच्या एका महिन्यातच हा शेअर ३२ टक्क्यांनी वर गेला आहे. आता बीईएमएल कंपनीने ताज्या प्रकल्पाची माहिती देताना मेट्रो डब्यांच्या उभारणी आणि बांधणीच्या कंत्राटाबरोबरच बंगळूरू मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना त्याचं प्रशिक्षण आणि देखभालीचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. त्यामुळे या कराराची व्याप्ती १५ वर्षांची असेल. (BEML Share Price)
(हेही वाचा – Hindustan Copper Share Price : हिंदुस्तान कॉपर शेअरची कशी आहे वाटचाल?)
एकीकडे ही सकारात्मक बातमी असतानाच मोतीलाल ओस्वाल या देशातील आघाडीच्या संशोधन संस्थेनं बीईएमएल कंपनीत रस दाखवला आहे. सकारात्मक तिमाही अहवालाबरोबरच या मोतीलाल ओस्वाल यांनी आपली व आपल्या फंडातील पैशाची गुंतवणूक या शेअरमध्ये वाढवली आहे. मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल म्युच्युअल फंडाने २७ मार्चला बीईएमएल कंपनीचे २.६६ लाख शेअर विकत घेतले आहेत. (BEML Share Price)
यापूर्वी मोतीलाल ओस्वाल यांची या शेअरमधील गुंतवणूक १ टक्क्यांहूनही कमी होती. एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, इन्व्हेसिको अशा संस्थांनीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. आयसीआयसीआय कंपनीची गुंतवणूक ६.१३ टक्के इतकी आहे. (BEML Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community