-
ऋजुता लुकतुके
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात सगळ्यांना आयात शुल्कवाढीच्या घोषणेनं घाबरवलं आहे. २० जानेवारीला ट्रम्प सत्तेत आल्यापासून शेअर बाजारात लाल रंगाचा खेळ सुरू झाला आहे. पण, अशावेळी दोन क्षेत्र आहेत जी भारतीय शेअर बाजारांना निदान थोडा सहारा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यातील एक आहे. फार्मा. कारण, ट्रम्प यांनी फार्मा कंपन्यांकडून होणाऱ्या आयातीवर आयात शुल्क वाढवणार नाही, असं निदान तोंडी म्हटलं आहे. आणि दुसरं क्षेत्र आहे दूरसंचार कंपन्या. या कंपन्यांचा मूळातच परदेशातील व्यापार कमी आहे आणि जे मूलभूत टॉवर उभारणीचे व्यवसाय आहेत ते फारसे अमेरिकेशी निगडित नाहीत. या कारणामुळे मागच्या काही दिवसांत भारतीय दूरसंचार कंपन्या तेजीत दिसत आहेत. शिवाय दरवाढ आणि कमी झालेली स्पर्धा यांचा फायदाही त्यांना मिळाला आहे. रिलायन्स जिओ आणि भारतीय एअरटेल या देशातील मुख्य दोन दूरसंचार कंपन्या आहेत आणि दोघांमधील बाजारातील हिस्सेदारीतील दरीही आता कमी होत चालली आहे. (Bharti Airtel Share Price)
मागच्या आठवडाभर झालेल्या पडझडीतून सुरवातीला धक्का बसला असला तरी भारती एअरटेलचा शेअर आता सावरला आहे. मागच्या अख्ख्या आठवड्यात या शेअरमध्ये दीड टक्क्यांची वाढ झाली आहे. तर शुक्रवारच्या दिवशीही शेअर ४० अंशांनीच का होईना पण वर होता. कारण, बाकी सगळीकडे लाल रंगाचा चिखल असताना निदान इथं हिरवळ पाहायला मिळाली. (Bharti Airtel Share Price)
(हेही वाचा – Viswanathan Anand : भारताचा पहिला बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंद सध्या काय करतो?)
अशातच भारती एअरटेलसाठी एक सकारात्मक बातमीही पुढे आली आहे. जागतिक संशोधन संस्था जेफरीजने भारतीय दूरसंचार कंपन्यांच्या बाबतीत सकारात्मक अहवाल सादर केला आहे. या कंपन्याचा महसूल नुकत्या संपलेल्या तिमाहीत १६ टक्क्यांनी वाढला आहे. नवीन शहर आणि ग्रामीण क्षेत्रात कंपन्यांनी ग्राहक जोडले आहेत आणि दरवाढीमुळे महसूल आणखी वाढणार आहे. या सकारात्मक गोष्टींकडे बोट दाखवत जेफरीजने भारती एअरटेलसहीत रिलायन्सवरही खरेदीचा सल्ला दिला आहे. तीन आधाडीच्या दूरसंचार कंपन्यांमध्ये एअरटेलची ग्राहक संख्या ही सगळ्यात वाढली आहे, असं कंपनीने नमूद केलं आहे आणि दरवाढ करूनही महसूल तसंच ग्राहक संख्या वाढल्यामुळे ही दरवाढ लोकांनी स्वीकारलेली दिसते, असं त्यांचं निरीक्षण आहे. (Bharti Airtel Share Price)
मॅक्वेरी या आणखी एका जागतिक संस्थेनंही भारतीय दूरसंचार कंपन्यांसाठी सकारात्मक अहवाल सादर केला आहे. एअरटेल कंपनीकडे येणारा पैशाचा ओघ वाढणारा आहे, याकडे मॅक्वेरीने लक्ष वेधलं आहे. जागतिक अनिश्चिततेचा फटका दूरसंचार कंपन्यांना फारसा बसणार नसल्याची गोष्टही त्यांनी अधोरेखित केली आहे. पण, दोघांनीही या शेअरचं विशिष्ट लक्ष्य स्पष्ट केलेलं नाही. (Bharti Airtel Share Price)
(डिस्क्लेमर-शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी वा गुंतवणुकीवर सल्ला देत नाही. लेखातील मतं जाणकारांची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community