महाराष्ट्रातल्या १६ बोली आणि ३५ संघांच्या सहभागाने रंगलेली बोलीभाषा एकांकिका स्पर्धा

मराठी नाट्यवर्तुळात महत्वाच्या व विशेष एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या सहाव्या वर्षी तब्बल १६ बोलींमधून महाराष्ट्रभरातले ३५ संघ सहभागी झाले आणि त्यातून निवड झालेल्या ७ संघांमध्ये १८ जानेवारीला दादर येथील शिवाजी मंदिरच्या रंगमंचावर अंतिम फेरी रंगणार आहे. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) आणि सुप्रसिध्द दीपक फरसाण मार्ट यांच्या सहकार्याने सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट यांनी आयोजित केलेल्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेला दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या बोली व शैलीतील एकांकिका हे या वेळेच्या अंतिम फेरीचे वैशिष्ट्य असणार आहे.

प्राथमिक फेरीमध्ये भावेश कुंटला, ज्ञानेश्वरी मंडलिक, ऋतिका मोरे, प्रतिक ठोंबरे, संजय जाधव, ईशा खामकर, सारंग हेगिष्टे, मयूर जाधव, धनश्री साटम व वरद पाटील यांना अभिनय सन्मानपत्रे मिळाली. १८ जानेवारीला सकाळी ९ वाजल्यापासून शिवाजी मंदिरमध्ये सुरु होणार्‍या अंतिम फेरीचे उद्घाटन प्रसिध्द निर्माते विद्याधर पाठारे यांच्या हस्ते होणार आहे, तर सायंकाळी प्रसिध्द अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल. ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुध्दीसागर, लेखक-दिग्दर्शक देवेन्द्र पेम आणि लेखक-अभिनेते अभिजीत गुरु परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

अंतिम फेरीमध्ये सहभागी झालेले ७ संघ व त्यांच्या एकांकिका पुढीलप्रमाणे : अभिनय-कल्याण (जीर्णोध्दार-घाटी बोली), ज्ञानदीप कलामंच-ठाणे (यासनी मायनी यासले-अहिराणी बोली), ज्ञानसाधना नाट्यपरिवार-ठाणे (भोकरवाडीचा शड्डू-घाटी बोली), कलांश नाट्यसंस्था-मुंबई (जिन्याखालची खोली-चिपळूण कोंकणी बोली), के. एम. प्रॉडक्शन-ठाणे (तहान-वर्‍हाडी बोली), एकदम कडक नाट्यसंस्था-भाईंदर (आखाडा-घाटी बोली), गुरुनानक खालसा महाविद्यालय-मुंबई (कोळसा-कोल्हापूरी)

प्रसिध्द नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेला प्रसिध्द नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्त रुप दिले आणि २०१६ पासून ही स्पर्धा सुरु झाली. दोन वर्षांच्या कोविड काळानंतर या स्पर्धेचे ५ वे वर्ष जानेवारी २०२२ मध्ये उत्फुल्ल वातावरणात बहरले आणि कोविड काळानंतर हाऊसफुल्ल झालेली ही पहिली एकांकिका स्पर्धा ठरली. पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रभरातून अनेक बोलींमधून २१३ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.

रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरुप असून प्रथम चार सांघिक विजेत्यांसाठी अनुक्रमे २५०००, २००००, १५००० व ५००० अशी पारितोषिके आहेत. प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्काराने गौरवण्यात येणार असून हे पारितोषिक प्रख्यात अभिनेते अशोक सराफ व त्यांचे बंधू सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केले आहे. अन्य पारितोषिकांमध्ये लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्‍वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, विनोदी लेखन, विनोदी अभिनय, वाचिक अभिनय, व्यवस्थापन या सर्वच घटकांसाठी पारितोषिके आहेत. स्पर्धेच्या प्रवेशिका १५ जानेवारीपासून www.tickethub.co.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन मिळतील. रसिकांनी या आगळ्यावेगळ्या स्पर्धेला बहुसंख्येने प्रतिसाद देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here