गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा येथील अर्जुनी मोरेगाव परिसरात गुरुवारी सकाळी वाघाचा मृतदेह आढळून आला. पाच वर्षाच्या नर वाघाच्या मृतदेहातून त्याचे दोन सुळ्यासारखे दात आणि मिशा गायब असल्याने वनविभागाने या घटनेची शिकारीची नोंद केली. गुरुवारी सकाळी वनअधिका-यांनी गस्तीच्यावेळी वाघाचा मृतदेह आढळून आला. यंदाच्या वर्षातील वाघाच्या शिकारीची ही तिसरी घटना आहे.
असा घडला प्रकार
वाघाच्या शिकारीची माहिती मिळताच वनाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाघाच्या मृतदेहाच्या पाहणीनुसार, वाघाचा मृत्यू हा विद्युतप्रवाहामुळे झाल्याचा अंदाज आहे. वाघाची शिकार दोन दिवसांपूर्वी झाल्याचा वनअधिका-यांचा अंदाज आहे. वाघाच्या पायाचा पंजा कापण्याचाही प्रयत्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
(हेही वाचा –भूमिगत जल बोगद्याच्या कामात ‘मुंबई’चा जगात दुसरा क्रमांक!)
वाघाच्या मृतदेहावर आज शुक्रवारी शवविच्छेदन केले जाईल. मात्र वाघाच्या इतर अवयवांची शिकार होऊ नये म्हणून मृतदेहाच्या ठिकाणी वनाधिका-यांनी मोठा पहारा ठेवला. हिवाळ्यात सूर्यास्त लवकर होतो, सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करणे हे नियमबाह्य असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाकडून दिले गेले. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी दुपारी चार वाजता हजर झाल्याने वेळची मर्यादा आली, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल केला असून, आरोपींची शोध सुरु असल्याची वनअधिका-यांनी सांगितले.