मसाल्याच्या पदार्थांमधील महत्त्वाचा पदार्थ…जिचा वापर गोडधोड, तिखट पदार्थांमध्ये आवर्जून केला जातो. इतकंच नाही आयुर्वेदातही जिला महत्त्वाचं स्थान आहे…तो पदार्थ म्हणजे ‘वेलची’. वेलचीला मसाल्याची राणी असेही म्हटले जाते. गेल्या काही वर्षांत विविध खाद्यपदार्थांत वेलचीचा वापर वाढल्याने स्थानिक बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारात वेलचीच्या भावात वाढ झाली आहे.
यावर्षी वेलचीच्या उत्पादनात 20 ते 30 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे 1 किलो वेलचीचा दर 3 हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्यातच सध्या सणासुदीचा काळ असल्यामुळे वेलचीची दरवाढ कायम राहणार असल्याचा अंदाजही व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.
दुग्धजन्य पदार्थ, मुखवास, तेल काढण्यासाठीही वेलची वापरली जाते. त्यामुळे पूर्वीपेक्षाही वेलचीला मागणीला जास्त आहे.केरळ राज्यात वेलचीचे उत्पादन घेतले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वेलची पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या दुग्धजन्य पदार्थ जसे श्रीखंड, लस्सी, मिठाई, आईस्क्रीम, फ्लेवर्ड मिल्क यांसह मुखवास आणि वेलचीचे तेल मिळवण्यासाठी हॉटेल उद्योगात वेलचीचा वापर वाढला आहे. त्यामुळे वेलचीच्या मागणीत वाढ झाली आहे, अशी माहिती मुंबईतील वेलचीचे मोठे व्यापारी मनन देसाई यांनी दिली.
वेलचीचे दर
मागील वर्षात भारतात वेलचीचे उत्पादन ३५ ते ३८ हजार टन इतके झाले होते. मात्र यावर्षी हे उत्पादन ३० हजार टन इतकेच झाले आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने ज्यावेळी पावसाची गरज होती, त्यावेळी पाऊस आला नाही. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने काही प्रमाणात दर वाढले आहेत,मात्र या वाढत्या दराने वेलची उत्पादकांना फायदा झाला आहे.आपल्याकडे ‘पानभर वेलची’ या जातीचे उत्पादन घेतले जाते.त्यात मिडीयम, गोल्ड हे प्रकार येतात,अशी माहिती नवी मुंबई मर्चंट चेंबरच्या अध्यक्ष किर्ती राणा यांनी दिली आहे. बाजारात पानभर वेलची सुमारे 1500 रुपये किलो, मिडियम वेलची सुमारे 2200 रुपये किलो आहे.
Join Our WhatsApp Community