दिवाळी जवळ आली की सरकारी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा असते ती म्हणजे बोनस केव्हा होणार? मात्र केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदा मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकार रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देणार आहे. रेल्वेच्या 11.27 लाख कर्मचाऱ्यांना 1832 कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार असून याची कमाल मर्यादा 17 हजार 951 रुपये आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बुधवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.
( हेही वाचा : कोकणातील संगमेश्वर रेल्वेस्थानकातील फलाटाची दुरवस्था; प्रवाशांची गैरसोय)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2021-22 साठी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पीएलबी म्हणजेच उत्पादनाशी निगडीत बोनस देण्यासाठी मंजुरी दिली आहे.
11 लाख कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस
दरवर्षी दसऱ्याच्या आधीच पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येतो. यावर्षी देखील रेल्वेच्या सुमारे 11 लाख 27 हजार अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी बोनसची रक्कम अदा करण्यात आली आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला देण्यात येणारी 78 दिवसांसाठीची सर्वाधिक रक्कम 17 हजार 951रुपये इतकी आहे. ही रक्कम रेल्वेमार्गाचे देखभाल कर्मचारी, चालक आणि गार्ड, स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, नियंत्रक, पॉईंट्समन अशा विविध श्रेणीतील कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारीवर्ग तसेच ‘क’ गटातील इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली 78 दिवसांच्या बोनसची अंदाजित रक्कम सुमारे 1832.09 कोटी रुपये इतकी आहे. रेल्वेच्या कामगिरीत अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी बोनसची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येते.
Join Our WhatsApp Community