उकाडा वाढल्याने स्वेटर विक्रेत्यांना भरली ‘हुडहुडी’

नोव्हेंबर महिन्याची चाहूल लागताच ठाण्यासह आसपासच्या शहरात गारठा जाणवायला लागतो. थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांच्या खरेदीकडे वळतात. मात्र यंदा हवामान बदलामुळे नोव्हेंबर अखेरीसही गारठा जाणवत नसल्याने स्वेटर तसेच उबदार कपड्यांची विक्री थंडावली आहे.

मागील वर्षी मागणीत वाढ

ठाण्यातील बाजारपेठेत पंजाबमधील लुधियाना येथून विविध प्रकारच्या स्वेटरसह उबदार कपड्यांची आयात होते. यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीला बाजारपेठेत हिवाळ्यानिमित्त हे कपडे आले. मागील वर्षी कोरोनाच्या भीतीने थंडीच्या मोसमात सर्दी-खोकला होऊन कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून ग्राहकांनी ऑक्टोबरच्या शेवटापासून स्वेटरची खरेदी सुरु केली. त्यामुळे मागील वर्षी स्वेटरच्या मागणीत 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाली होती.

यंदा थंडी लांबली

मात्र यंदा लसीकरणामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाली असून, अवकाळी पावसाची रिपरिप, दुपारी कडाक्याचे ऊन, रात्री घाम काढणारा उकाडा आणि पहाटे थोडासा गारवा, अशा विचित्र वातावरणामुळे लोकांनी सध्या स्वेटर आणि उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी पाठ फिरवली आहे, त्यातच नोव्हेंबर महिन्यात पडणारी गुलाबी थंडी यंदा लांबली आहे. सध्या बाजारपेठेत लहान मुलांसह, पुरुष आणि स्त्रियांचे विविध प्रकारचे स्वेटर विक्रीसाठी दाखल झाले आहेत. लोकरीच्या कपड्यांसह नव्या प्रकारचे जॅकेट, तसेच नक्षीदार शाल, स्कार्फ, हातमौजे, ब्लॅंकेट इत्यादी थंडीत वापरले जाणारे कपडे बाजारात दाखल झाले आहेत.

 (हेही वाचा: महापालिकेची पहिली सभा अत्यंत शिस्तबद्ध )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here