आता पीपीई किट्स देणार ‘थंडगार’ अनुभव! मुंबईतील विद्यार्थ्याचे कोविड योद्ध्यांसाठी संशोधन

ही आगळीवेगळी व्हेंटिलेशन प्रणाली पीपीई सूट मध्ये असताना पंख्याखाली बसल्याचा अनुभव देते.

गरज ही शोधाची जननी असते, असं म्हणतात. मुंबईतल्या निहाल सिंग आदर्श, या विद्यार्थ्यासाठी त्याच्या डॉक्टर आईची गरज ही त्याच्या संशोधन आणि कल्पकतेला प्रेरणा देणारी ठरली आहे. त्याच्या या संशोधनाला ‘कोव्ह-टेक’ असे नाव देत निहालने पीपीई किटमध्ये हवा खेळती राहील, अशी व्यवस्था केली आहे. त्याच्या या नव्या आटोपशीर आणि किफायतशीर पीपीई किटमुळे, कोविडयोद्ध्यांना होणाऱ्या त्रासावर एक उत्तम तोडगा निघाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

पीपीई सूटचा ‘कूल’ अनुभव

मुंबईतल्या के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात, द्वितीय वर्षाला असलेल्या, निहालने आपल्या या संशोधनाविषयी पत्रसूचना कार्यालयाला माहिती देताना इतर पीपीई सूट्स आणि ‘कोव्ह-टेक’ सूटच्या वापराचा अनुभव कसा वेगळा आहे, हे समजावून सांगितले. “कोव्ह-टेक व्हेंटिलेशन प्रणाली’ तुम्हाला पीपीई सूट मध्ये असताना पंख्याखाली बसल्याचा अनुभव देते. या प्रणालीत आजूबाजूची हवा आता घेतली जाते, ती फिल्टर करुन पीपीई सूटच्या आत येते. सध्या उपलब्ध असलेल्या पीपीई सूटमध्ये हवा खेळती राहण्याची काहीही व्यवस्था नाही, त्यामुळे ते घातल्यावर व्यक्तीला अत्यंत गरम होते आणि घुसमटल्यासारखे वाटते. मात्र, या संशोधनामुळे या कष्टदायक अनुभवातून सुटका होऊ शकेल आणि पीपीई सूटच्या आतही हवा खेळती राहू शकेल.” व्हेंटिलेशन प्रणालीचे डिजाईन हवा बंदिस्त करण्याचे काम करते आणि दर 100 सेकंदांना थंड हवा सोडते.

 

ही समस्या दूर करण्याचा विचार मनात असतानाच, कोविड-संबंधित उपकरणे डिझाईन करण्याच्या  टेक्नोलॉजीकल बिझनेस इन्क्यूबेटर, रिसर्च इन्होवेशन इनक्युबेशन डिझाईन लॅबोरेटरी यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घ्यायचा त्याने निर्णय घेतला.

असे तयार झाले डिझाईन

कल्पक डिजाईन बनवण्याच्या स्पर्धेच्या तयारीला लागल्यावर, निहालने याचा अगदी प्रथमिक नमुना तयार केला. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील डॉ उल्हास खारुल यांच्या मार्गदर्शनाखाली, निहालने आपले पहिले डिझाईन 20 दिवसांत तयार केले. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारितील, राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्यमशीलता विकास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत, सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या संधोधन, नवोन्मेष इन्क्युबेशन डिजाईन प्रयोगशाळा- RIIDLची त्याला या कामात मदत मिळाली. सहा महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर या उपकरणाचा प्राथमिक अवस्थेतील नमुना तयार झाला. ते गळ्यात घालण्याचे, इंग्रजी ‘U’ आकाराचे उपकरण होते, ज्यातून हवा आत खेचली जात होती. उशीसारखी रचना असलले हे उपकरण मानेभोवती घालता येत होते. मात्र, या उपकरणातून सातत्याने निर्माण होणारी कंपने आणि त्यांच्या आवाजामुळे, मानेभोवती हे उपकरण घालणे, डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना अत्यंत त्रासदायक होईल. त्यामुळे मग तो नमुना रद्द करुन, नव्या प्रकारच्या डिजाईन निर्मितीवर काम करण्यास निहालने सुरुवात केली. ज्या उपकरणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत होईल, त्यांच्या कामात अडथळा येणार नाही, असे उपकरण विकसित करण्यावर आमचा भर होता, असे निहालने पत्रसूचना कार्यालयाला सांगितले.

उपकरणाचा अंतिम नमुना : एका साध्या बेल्टइतका सुलभ

निहालने तयार केलेल्या या उपकरणाचे अंतिम डिजाईन तयार असून ते एखाद्या बेल्टसारखे वापरता येते. आता असलेल्या पीपीई सूटवर देखील ते घालता येऊ शकते. या डिझाईनमुळे दोन उद्देश साध्य केले जातात.

  1. आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई सूटमध्येही व्हेंटिलेशन सुविधा मिळून त्यांचा त्रास कमी होऊ शकतो.
  2. त्यांचे विविध बुरशीजन्य आजारांपासूनही संरक्षण होऊ शकते.

 

हे व्हेंटिलेटर शरीराजवळ घातले जात असल्याने, त्यासाठी अत्यंत उच्च दर्जाचे घटक वापरले जातात. तसेच सुरक्षाविषयक उपाययोजनांचेही काटेकोर पालन केले गेले आहे, असे निहारने सांगितले. “जेव्हा मी माझ्या आईला सांगितले, की माझ्या या शोधाबद्दल मी पेटंटसाठी अर्ज करणार आहे, तेव्हा ती खूप खूश झाली. माझी आई डॉक्टर असल्याने, ती जेव्हा कामावर जाते, तेव्हा या उपकरणाचा वापर करतेच.” असे निहालने सांगितले. लिथियम-आयोनची बॅटरी वापरुन ही प्रणाली तयार करण्यात आली असून, ते सहा ते आठ तास काम करते.

या संस्थांचे आर्थिक बळ

कोव्ह-टेक व्हेंटिलेशन व्यवस्था सत्यात उतरवण्याचे श्रेय ‘निधी’ या केंद्र सरकारच्या उपक्रमाला जाते. अशा नवोन्मेशी युवकांच्या संशोधन आणि विकासाला पाठिंबा तसेच प्रोत्साहन देण्यासाठीच्या-प्रयास (PRAYAS) या संस्थेने या  संशोधनासाठी 10 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले. या उदयोन्मुख संशोधकाने, ‘वॉट टेक्नोव्हेशन्स’ नावाची स्टार्ट अप संस्था सुरू केली आहे, त्याच्याच अंतर्गत ही व्हेंटिलेशन प्रणाली विकसित केली गेली. प्रयास व्यतिरिक्त या प्रणालीसाठी, RIIDL आणि के जे सोमय्या व्यवस्थापन संस्था यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘न्यू व्हेन्चर इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम’ अंतर्गत 5 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

अत्यंत किफायतशीर आणि स्वस्त पर्याय

डिजाईन अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या रित्विक मराठे आणि त्याची सहाध्यायी सायली भावसार, यांनीही निहालला त्याच्या या प्रकल्पात मदत केली. सायलीने त्यांच्या कंपनीसाठी वेबसाईट विकसित करण्याची जबाबदारी घेत, https://www.watttechnovations.com, या वेबसाईटचे डिझाईन तयार केले.

पुण्याच्या साई स्नेह रुग्णालयात आणि लोटस मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात हे उपकरण वापरले जात आहे. येत्या मे आणि जून महिन्यात या उपकरणाचे उत्पादन वाढवण्याची कंपनीची योजना आहे. या एका उपकरणाची किंमत 5 हजार 499 रुपये इतकी आहे. या प्रकारच्या इतर उपकरणांची किंमत सुमारे एक लाख रुपये इतकी आहे. त्या तुलनेत, हे उपकरण अत्यंत किफायतशीर आहे.

लोटस मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात कोव्ह-टेक व्हेंटीलेशन प्रणालीचा वापर

साई स्नेह  रुग्णालयात कोव्ह-टेक व्हेंटिलेशन प्रणालीचा वापर

या उपकरणाच्या पहिल्या उत्पादनाची खेप बाजारात आली असून, त्यापैकी 30-40 युनिट्स देशभरातल्या डॉक्टर्स/स्वयंसेवी संस्थांना वापरण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. आणखी 100 उपकरणांचे उत्पादन सुरू असून ते लवकरच बाजारात येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here