पवई येथील एस. एम. शेट्टी महाविद्यालयाच्या सभागृहात ११ मार्चला स्त्री-पुरुष समानता, लिंगभेद, मर्दांगी व लैंगिक विविधता समभाव या विषयावर सिने-महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लिंग-समभावाच्या मुद्द्यांवर काम करणारे हरीश सदानी, जमीर कांबळे, सचिन आशा सुभाष व लक्ष्मी यादव, तसेच प्राध्यापिका शर्मिला श्रीकुमार, सिनेदिग्दर्शिका अरुणाराजे पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी असे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून, त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
( हेही वाचा : शिमग्याक जातास? रेल्वेने सुरू केल्या या विशेष गाड्या )
लैंगिक समानता म्हटलं की केवळ स्त्रियांच्या समस्या दिसतात. पण हा विषय खूप व्यापक आहे. तो केवळ स्त्रियांपुरता मर्यादित नाही. असे लिंग-समभावाच्या मुद्द्यांवर काम करणारे हरीष सदानी म्हणाले. यानंतर त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि यापुढेही सर्वांनी याविषयावर काम करावे असे आवाहन केले.
भेदभाव करू नका
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण होत्या. “हरीष सदानी हे खूप मोठं काम करत आहेत. ते लोकसत्तामध्ये चतुरंग पुरवणीत लेख लिहीत असताना, मी न चुकता त्यांचे लेख वाचायचे. मी कामानिमित्त बाहेर असले तर माझ्या घरच्यांना फोन करून सांगायचे की त्यांचे लेख सांभाळून ठेवा.” असे सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आपण सर्वांनी एकमेकांकडे माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला ही समस्या कळणार नाही. असेही त्या म्हणाल्या.
मुलांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, “तुम्हाला ह्या वयात या विषयाची जाणीव तुमच्या कॉलेजतर्फे करून दिली जात आहे, म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला जर वेगळी लैंगिक निवड असलेली व्यक्ती भेटली तर तिला तिच्या मतावर ठाम राहायला मदत करा. तिला स्वतःला ओळखायला मदत करा. भेदभाव करू नका.” असे सोनाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
तरूणांचे प्रबोधन
तरुणांना प्रबोधन करताना महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीधर शेट्टी म्हणाले की, “आमच्या कॉलेजमध्ये होणारा हा पहिला असा अद्भुत कार्यक्रम आहे. सर्व मुलांना या कार्यक्रमामुळे भविष्यात खूप फायदा होणार आहे.” सर्व ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन झाल्यानंतर मूळ कार्यक्रमाला म्हणजेच समभाव सिने-महोत्सवाला दणक्यात सुरुवात झाली.
Join Our WhatsApp Community