‘दगडूशेठ’ गणपतीला ५०० डाळिंबांचा नैवेद्य!

गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे.

116

डाळिंबाचा महानैवेद्य…फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतीची आकर्षक आरास…आणि त्यामध्ये गाभा-यात विराजमान गणरायाचे विलोभनीय रुप शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यात गणरायासमोर सुमारे ५०० डाळिंबांचा नैवेद्य दाखविण्यात आला. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे गाभा-यात या विषयाशी सुसंगत अशी आकर्षक पुष्पसजावट देखील करण्यात आली.

काय आहे शेषात्मज गणेश जयंतीमागील आख्यायिका?

गणेश जयंतीनिमित्त मंदिरात सोमवारी सकाळी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.

(हेही वाचा : पर्यटकांची लोणावळा-खंडाळामध्ये गर्दी : कोरोना निर्बंधांचे उल्लंघन)

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर ,देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. त्यामुळे ही सजावट व महानैवेद्य दाखविण्यात आला.

भक्तांकरीता घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे http://www.dagdushethganpati.com , http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.