गिर्यारोहणासाठी गेले पण, परतलेच नाहीत…

121

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मानपाडा भागात गिर्यारोहणासाठी गेलेल्या संजीव देशपांडे (६२) यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी घडलेल्या या घटनेनंतर सदर प्रकरणाची नोंद चितळसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

संजीव देशपांडे हे पवई येथील हिरानंदानी इस्टेट भागात राहत होते. ते दररोज त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सकाळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गिर्यारोहणासाठी जायचे. त्याच प्रमाणे ते रविवारी एकटेच गिर्यारोहणासाठी गेले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांनी घोडबंदर-मानपाडा येथील निसर्ग परिचय केंद्राजवळ वाहन उभे केले. त्यानंतर त्यांनी उद्यानात प्रवेश केला. परंतु दुपारी उशिरापर्यंत ते घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना संपर्क होऊ शकला नाही.

( हेही वाचा : Russia Ukraine War : जग पुन्हा जातेय का अणु युद्धाच्या दिशेने? )

टायगर पॉईंटजवळ बेशुद्धावस्थेत आढळले 

दुपारनंतर देशपांडे यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रांनी याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. वन विभागाने चितळसर पोलीस, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संजीव यांचे गिर्यारोहक मित्र यांच्या मदतीने दुपारनंतर संजीव यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर ते टायगर पॉईंटजवळ बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.