देशातून होणाऱ्या डाळिंब निर्यातीत मोठी घट झाली आहे. २०२०-२१मध्ये देशातून सुमारे ७० हजार टन, तर २०२१-२२ मध्ये ५० हजार टन डाळिंबांची निर्यात झाली आहे. यापूर्वी देशातून होणाऱ्या डाळिंब निर्यातीत राज्याचा वाटा शंभर टक्के असायचा, आता गुजरातमधूनही निर्यात सुरू आहे.
( हेही वाचा : हापूस स्वस्त होईना… )
डाळिंब निर्यात जवळपास ठप्प
सोलापूर, पुणे, सांगली, अहमदनगर जिल्ह्यातून उत्पादित होणाऱ्या निर्यातक्षम दर्जाच्या डाळिंबाची आखाती देशांमध्ये मोठी निर्यात होत होती. गेल्या दोन वर्षांपासून इंदापूर, सोलापूर, सांगोला, अहमदनगर भागांत चांगला पाऊस होत आहे. मात्र, या पावसामुळे डाळिंब बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून हजारो हेक्टर बागा नष्ट झाल्या आहेत. याचाच परिणाम म्हणून राज्यातील डाळिंब निर्यात जवळपास ठप्प झाली आहे.
५० हजार टनांमध्ये गुजरातचा २० टक्के वाटा
डाळिंब उत्पादक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातून होणारी डाळिंब निर्यात शंभर टक्के महाराष्ट्रातूनच होत होती. २०२०-२१मध्ये सुमारे ७० हजार टन निर्यात झाली होती. विविध प्रतिकूल बाबींचा परिणाम म्हणून यंदाही ५० हजार टन निर्यात करण्यात आली आहे. त्यातही गुजरातमधून निर्यात होऊ लागली आहे. गुजरातमधील जामनगर आणि अहमदाबादशेजारील भागांत डाळिंबाची लागवड वाढली आहे. यंदाच्या निर्यातीच्या ५० हजार टनांमध्ये गुजरातचा २० टक्के वाटा आहे. गुजरातमधील डाळिंबाची मुख्यत्वे कांडला बंदरातून निर्यात होते.
Join Our WhatsApp Community