दगडूशेठ गणपतीसमोर ५०० शहाळ्यांची आरास!

वैशाख वणव्यापासून भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्यासोबत जागतिक महामारी कोरोना लवकर दूर व्हावी, अशी भावना या महोत्सवामागील आहे.

133

श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे दाखले पुराणात सापडतात. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवात तब्बल ५०० शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे.

कोरोना महामारीपासून रक्षण करण्याची प्रार्थना!  

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांच्या हस्ते गणेश जन्माची पूजा  व अभिषेक झाला. बुधवारी सूर्योदयाच्या वेळी हा गणेशजन्म सोहळा पार पडला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील झाला. वैशाख वणव्यापासून भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्यासोबत जागतिक महामारी कोरोना लवकर दूर व्हावी, अशी भावना या महोत्सवामागील आहे.

(हेही वाचा : शेतकऱ्यांना लुटणारी टोळी गजाआड! ट्रॅक्टर, गायी, चोरायचे!)

पुष्टिपती विनायक जयंतीमागील आख्यायिका! 

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात. दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला असतो. त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात. त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा करतात. वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद््भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.