पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पण तरीही इंधनाची मागणी काही कमी होताना दिसत नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील इंधनाची मागणी ही मार्चमध्ये 4.2 टक्क्यांनी वाढल्याचे समजत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात इंधनाच्या मागणीत झालेली ही वाढ हा तीन वर्षांतील उच्चांक असल्याचे म्हटले जात आहे.
तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. मार्चमध्ये पेट्रोलियम उत्पादनाचा वापर हा 194.10 लाख टन इतका झाला. 2019 नंतर झालेली ही सर्वात मोठी वाढ असल्याचे म्हटले जात आहे. कोविड काळात लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली वाहतूक आता पुन्हा एकदा रस्त्यावर येत असल्याने मागणीत ही लक्षणीय वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः ऑनलाईन शिक्षणासाठी आता डिजिटल विद्यापीठ! विद्यार्थ्यांना होणार फायदा)
मागणीत वाढ
देशातील सर्व प्रकारच्या इंधन वापरात सर्वाधिक वाटा हा डिझेलचा आहे. सर्व पेट्रोलियम उत्पादनांच्या वापरापैकी 40 टक्के वापर हा डिझेलचा होत आहे. डिझेलची मागणी मार्च महिन्यात 6.7 टक्क्यांनी वाढून 77 लाख टन इतकी झाली आहे. कृषी क्षेत्रातील वाढती मागणी तसेच ग्राहक व पेट्रोल पंपांनी दरवाढीच्या अपेक्षेने केलेल्या साठ्यामुळे डिझेलचा वापर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. तर पेट्रोलची विक्री 6.1 टक्क्यांनी वाढून 29.10 लाख टन इतकी झाली आहे. मार्च महिन्यात दोन्ही इंधनांच्या मागणीत झालेली ही वाढ ही कोरोनापूर्व काळापेक्षा जास्त आहे.
(हेही वाचाः घरविक्रीत मुंबई ‘देशात भारी’, तीन महिन्यांत झाली इतक्या घरांची खरेदी)
घरगुती गॅसच्या वापरात वाढ
मार्चमध्ये स्वयंपाक घरातील घरगुती गॅसची मागणीही 9.8 टक्क्यांनी वाढून 24.8 लाख टन इतकी झाली आहे. 2022 च्या आर्थिक वर्ष समाप्तीवेळी इंधनाची मागणी 4.3 टक्क्यांनी वाढून 20 कोटी 27 लाख टन इतकी झाली आहे. 2020 नंतरच्या आर्थिक वर्षातील ही सर्वाधिक वाढ आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात पेट्रोलचा वापर 10.3 टक्क्यांनी वाढून 308.5 लाख टन, तर डिझेलची विक्री 5.4 टक्क्यांनी वाढून 776 लाख टन झाली आहे. 2021-22 मध्ये पेट्रोलची वाढलेली मागणी ही आतापर्यंतची सर्वाधिक मागणी आहे. वाहन आणि घरगुती इंधनापेक्षा औद्योगिक इंधनाच्या मागणीत मोठी घट झाल्याचे पहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community