नागपुरात त्याकाळी मराठी चित्रपट उशिराने लागायचे. हिंदी सिनेमांचा तेथे बोलबाला होता. पण, मी नववीत असताना पुण्यात क्लास चुकवून महेश कोठारेंचा ‘धुमधडका’ हा चित्रपट पहिला आणि त्यांचा आजन्म चाहता झालो, अशी लहानपणीची आठवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
प्रसिद्ध अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या “डॅम इट आणि बरंच काही” या आत्मचरित्राचे प्रकाशन बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांच्यासारख्या कलाकारांमुळे मराठी सिनेमा घराघरात पोहोचला; किंबहुना मराठी सिनेमाचे विश्व त्यांच्यामुळे बदलले. महेश कोठारे यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर काहीकाळ त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. पण, त्यावर मात करून त्यांनी पुन्हा यशाचे शिखर गाठले. मराठी सिनेमाला त्यांनी नवनव्या गोष्टी दिल्या. नवनवीन प्रयोग केले. त्यांचे हे पुस्तक म्हणजे केवळ आत्मचरित्र नव्हे, तर जीवनगाथा आहे. त्यामुळे सर्वांनी ते आवर्जून वाचावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.’
पुस्तक नव्हे, सिनेमाची कथा – मंदार जोशी
मी याआधी आमीर खान, नितीन चंद्रकांत देसाई यांचे चरित्र लिहिले आहे. त्यानंतर १० वर्षांनी हा योग आला. २६ जानेवारीला २०२२ रोजी कोठारे यांना मी ही कल्पना सांगितली. अवघ्या दोन मिनिटांत ते तयार झाले. पुढचे चार महिने दररोज दीड दोन तास बोलत होतो. या पुस्तकातले घटनाक्रम वाचताना एखादा सिनेमा पाहिल्याची अनुभूती येईल. महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांच्यातील मैत्रीचे अनेक किस्से यात आहेत, अशी माहिती पत्रकार मंदार जोशी यांनी दिली. जोशी यांनी या पुस्तकाचे संपादन-शब्दांकन केले आहे.
नवतरुणांसाठी मार्गदर्शक – महेश कोठारे
या पुस्तकात माझ्या आयुष्यातील अनेक चढउतार दिले आहेत. हे पुस्तक म्हणजे एक प्रवास. कोणाही तरुणाला सिने जगतात करिअर करायचे असेल, तर त्याला हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असे लेखक महेश कोठारे यावेळी म्हणाले.
(हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा नेता ईडीच्या रडावर)