श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना. श्रावण महिन्यातील मनाला भुरळ घालणाऱ्या ऊन पावसाने निसर्ग न्हाऊन निघालेला असतो आणि हिरवागार झालेला निसर्ग सणांचा आनंद द्विगुणित करत असतो. अशा या हसर्या, लाजर्या श्रावणातील एक अस्सल ग्रामीण मराठमोळा सण म्हणजे नागपंचमी.
परंपरा आणि आख्यायिका
नागपंचमीला घरोघरी नागाची पूजा करुन नागदेवतेला प्रसन्न केले जाते. कालिया नागाचा पराभव करुन यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपंचमी साजरी केली जाते. दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी उर्फ अहिल्या-गौतमी संगमावर स्नान करतात.
(हेही वाचाः नागपंचमी निमित्त नैवैद्याला काय बनवाल?)
शेतक-यांचा मित्र
हिंदु संस्कृतीत अनेक प्रकारे नागाची पूजा केली जाते. प्राचीन भारतीय लोकांनी नाग मारले जाऊ नयेत, म्हणून देवत्व देऊन त्याला पूजनीय बनवले. विविध प्रकारचे साप हे शेतकर्यांचे मित्र आहेत. धान्य मोठ्या प्रमाणावर फस्त करणारे उंदीर हे सापांचे मुख्य अन्न असल्याने उंदरांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी निसर्गात साप असणे आवश्यक आहे.
हरवत चाललेली नागपंचमी
लहान गावांत, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी आता पूर्वीसारखी साजरी होत नाही. या सणाला बर्याच ठिकाणी अजूनही नवविवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येण्याची पद्धत रूढ आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणी म्हणत झोके घेतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. अनंत म्हणजेच शेष, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या आठ नागांची या दिवशी पूजा केली जाते.
(हेही वाचाः आला मंगळागौरीचा सण!)
इतिहास जमा झालेला नागपंचमीचा उत्सव
सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या वाळवा तालुक्यातील शिराळा हे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी पूर्वी प्रसिद्ध होता. काळाच्या ओघात काही अनिष्ट पद्धती बंद करत असताना, बत्तीस शिराळ्यांतील हा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आता इतिहासजमा झाला आहे. शिराळ्याची ही नागपंचमी पूर्वी देशातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध होती.
Join Our WhatsApp Community