सिगिरिया- श्रीलंकेचा पहारेदार!

सिगिरिया येथील मिरर भिंतीवर लिहिलेले गद्य, कविता आणि प्राचीन पर्यटकांनी लिहिलेल्या भाषांचे १८०० तुकडे आहेत. ही भित्तीचित्रे सिगिरियाच्या इतिहासाची आणि श्रीलंकेच्या भाषेच्या उत्क्रांतीची एक अंतर्दृष्टी सादर करते.

सिगिरिया किंवा सिंहगिरी हा सुमारे 660 फूट उंच प्राचीन किल्ला श्रीलंकेच्या डांबुल्ला शहराजवळील मटाले जिल्ह्यात आहे. प्राचीन श्रीलंकेच्या इतिहासानुसार कुलावम्सा या राजाची जागा राजा कश्यप(इ.स. ४७३ ते ४९५) यांनी आपल्या नवीन राजधानीसाठी निवडली. त्याने या खडकाच्या माथ्यावर आपला वाडा बांधला आणि त्याच्या बाजूंना रंगीबेरंगी फ्रेस्केसने सजावट केली. या खडकाच्या अगदी अर्ध्या बाजूस एका लहान पठारावर त्याने प्रचंड सिंहाच्या रुपाने एक प्रवेशद्वार बनविले. या जागेचे नाव या संरचनेवरुन आले आहे.

व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध

कश्यप राजाच्या निधनानंतर सिगिरिया किल्ला बौद्ध मठ म्हणून वापरला जात असे. सिगिरियाची नोंद आज युनेस्कोनच्या वर्ल्ड हेरिटेज सूचीमध्ये असून ते प्राचीन शहरी नियोजनाच्या सर्वोत्कृष्ट आणि संरक्षित उदाहरणांपैकी एक आहे. येथे सापडलेली भारतीय आणि रोमन नाणी आणि कुंभारकाम तसेच उद्यानांच्या निर्मितीमध्ये पर्शियन शैलीतील केली गेलेली आत्मीयता या सर्व गोष्टी इतर देशांशी असलेले व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध दर्शवितात.

(हेही वाचाः वाडी रम वाळवंट : जॉर्डनचा स्वर्ग !)

सुंदर भित्तीचित्रे

सिगिरिया रॉकची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे सिगिरी ग्राफिटी, सिंहाचे पंजा प्रवेशद्वार, बोल्डर्स गार्डन, मिरर वॉल, महिलांच्या आकृत्यांचे फ्रेस्को पेंटिंग्ज, लँडस्केप गार्डनचे विस्तृत नेटवर्क, वॉटर गार्डन्स, खंदक, रामपर्ट्स आणि राजवाड्यांचे अवशेष. सिगिरिया येथील मिरर भिंतीवर लिहिलेले गद्य, कविता आणि प्राचीन पर्यटकांनी लिहिलेल्या भाषांचे १८०० तुकडे आहेत. ही भित्तीचित्रे सिगिरियाच्या इतिहासाची आणि श्रीलंकेच्या भाषेच्या उत्क्रांतीची एक अंतर्दृष्टी सादर करते. बहुतेक भित्तीचित्रं अर्ध नग्न स्त्रियांच्या सुंदर चित्रांचा उल्लेख करतात. या भित्तिचित्रांनी असे सिद्ध झाले आहे की, ही जागा राजा कश्यप यांचे निवासस्थान होते. येथील मजकुरामध्ये असेही सुचवले गेले आहे की, फ्रेस्कोमध्ये चित्रित केलेली मादी, म्हणजे राजाच्या राज दरबारातील स्त्रिया होत्या.

सिगिरिया वर्ल्ड हेरिटेजची हायड्रॉलिक अभियांत्रिकी प्रणाली

५व्या शतकात बांधलेला सिगिरिया हा प्राचीन श्रीलंकेच्या प्रगत वास्तुशास्त्र व अभियांत्रिकी कौशल्यांचे उत्तम उदाहरण आहे. सिगिरिया खडकाच्या शिखरावर बांधकामांचा पुरवठा करण्याबरोबरच, त्यावेळच्या अभियंत्यांनी २०० मीटर सिगरिया खडकाच्या वरच्या बाजूला असलेल्या जवळच्या तलावापासून राजवाड्याकडे पाणी पोचविणारी एक अत्यंत प्रगत हायड्रॉलिक्स प्रणाली देखील यशस्वीपणे स्थापित केली होती.

(हेही वाचाः मसाई मारा आणि विल्डेबीस्टचे स्थलांतर, एक अनोखा अनुभव!)

सिगिरिया आणि रामायण

लाल श्रीनिवास आणि डॉ. मिरांदो ओबेसेकरा यांनी केलेल्या संशोधानुसार, सिगिरिया ही रावणाचा सावत्र भाऊ कुवेरा याने तयार केलेले अलकामंडव या नावाचे शहर होते. कुवेराचा उल्लेख श्रीलंकेतील रामायणामध्ये केला गेला आहे. म्हणून इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, सिगिरियाचे रामायणाशी संबंध आहेत. असा विश्वास आहे की पठाराचा वरचा भाग रावणाच्या भव्य राजवाड्याचे ठिकाण होते. त्याची निर्मिती देवांचे खजिनदार कुबेर यांनी सोन्यापासून केली होती. एकदा नजर टाकल्यास हे ठिकाण किती मोठे आर्किटेक्चरल चमत्कार असू शकते याची प्रचिती येते. सिगिरिया किल्ला हा श्रीलंकेच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक आहे. शिवाजी महाराजांच्या रायगडासारखीच त्याची दैदिप्यमान ओळख आहे. सिगिरिया हा एका अर्थाने श्रीलंकेचा पहारेदार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here