Dev Diwali : दिवाळी तर संपली! मग ही देव दिवाळी म्हणजे काय?

26
Dev Diwali : दिवाळी तर संपली! मग ही देव दिवाळी म्हणजे काय?

देव दीपावली (Dev Diwali) हा एक अत्यंत शुभ भारतीय सण आहे. हा सण आपल्या हिंदू संस्कृतीत फार महत्त्वाचा आहे. देव दीपावली हा सण उत्तर प्रदेश इथल्या वाराणसी येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देव दीपावली साजरी करण्यात येते. देव दीपावलीच्या दिवशी वाराणसीच्या घाटांवर सर्वजण एकत्र येऊन हा देव दीपावलीचा उत्सव साजरा करतात.

देव दीपावलीची सुरुवात कशी झाली?

पौराणिक कथेनुसार कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून भूतांवर आणि राक्षसांवर भगवान महादेवांचा विजय म्हणून देव दीपावली (Dev Diwali) साजरी केली जाते. याव्यतिरिक्त महादेव आणि पार्वती मातेचे पुत्र भगवान कार्तिकेय यांचा जन्मही याच दिवशी झाला होता.

असं म्हटलं जातं की, समस्त देवी-देवता या दिवशी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्वर्गातून धरतीवर उतरतात. म्हणून समस्त देवी-देवतांच्या स्वागतासाठी वाराणसीचा घाट या दिवशी लाखो मातीच्या दिव्यांनी उजळून निघालेला असतो.

१९८५ सालापासून पंचगंगा घाटावर देव दिवाळीला (Dev Diwali) दिवे लावण्यास सुरुवात केली गेली. तसंच राज घाटापासून दक्षिण दिशेकडच्या रविदास घाटापर्यंत गंगा नदीच्या घाटांवर लाखो भाविक-भक्त मातीचे दिवे लावून हा दीपोत्सव साजरा करतात. तसंच ते पवित्र गंगा नदीत डुबकी मारतात. त्याला ‘कार्तिक स्नान’ असं म्हणतात. देव दीवाळी हा गंगा महोत्सवाचा शेवटचा दिवस असतो. वाराणसी हे शहर देवी-देवतांचं निवासस्थान आहे असं मानलं जातं.

(हेही वाचा – kamala nehru park mumbai : काय आहे कमला नेहरु पार्कचा इतिहास?)

देव दीपावलीचं क्षणचित्रांचं वर्णन
  • देव दीपावली (Dev Diwali) हा वाराणसी शहारामधला सर्वांत मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी वाराणसीचा घाट लाखो मातीच्या दिव्यांनी उजळून निघतो. पवित्र गंगा नदीचं पाणी वैभवशाली पौर्णिमेचा चंद्रप्रकाश प्रतिबिंबित करतं. हे विलोभनीय दृश्य अवर्णनीय आहे. हे दृश्य केवळ छान प्रकारे अनुभवता येतं.
देव दीपावलीची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
  • वाराणसी घाटाच्या गंगा नदीच्या काठावरच्या पायऱ्यांवर रविदास घाटापासून ते राज घाटापर्यंत गंगा देवीला श्रद्धा अर्पण करण्यासाठी लाखो दिव्यांची रोषणाई केली जाते.
  • या उत्सवादरम्यान वाराणसी शहरातली घरं-दारं दिवे आणि रांगोळ्यांनी सजवली जातात. तसंच संपूर्ण शहरांत देवी-देवतांच्या मिरवणुका काढल्या जातात.
  • कार्तिक स्नानाचे विधी करून भाविक पवित्र गंगेत स्नान करतात आणि संध्याकाळी गंगेला तेलाचे दिवे अर्पण करून दीपदानाची परंपरा पार पाडतात.
  • देव दीपावलीच्या (Dev Diwali) उत्सवादरम्यान वाराणसी शहर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. नदीच्या घाटांवर प्रकाश पसरवणारे आणि नदीत तरंगणारे हजारो दिवे हे श्वास रोखून पाहण्यासारखं दृश्य असतं.
  • देव-दीपावलीच्या संध्याकाळी गंगा आरती केली जाते. ही गंगा आरती पाहण्यासाठी देशभरातून लाखो लोक जमतात. २१ ब्राह्मण पंडित आणि २४ कुमारिका मिळून ही आरती करतात. गंगा आरतीच्या दरम्यान ढोल आणि शंख दुमदुमतात.
  • गंगा घाट दिव्यांनी आणि आरतीने सजलेला असताना संध्याकाळी बोटीतुन नदीपात्रात फिरण्यासाठी लोक उत्सुक असतात. बोटीतून घाटाचं ते दृश्य अतिशय मोहक दिसतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.