Dhirubhai Ambani : ५०० रुपये खिशात असताना धीरुभाईंनी अशी केली व्यवसायाची सुरुवात

Dhirubhai Ambani : धीरुभाईंचा मुलगा मुकेश अंबानी सध्या भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. 

44
Dhirubhai Ambani : ५०० रुपये खिशात असताना धीरुभाईंनी अशी केली व्यवसायाची सुरुवात
  • ऋजुता लुकतुके

असं म्हणतात की, सामान्य माणसाला जिथे अडचण दिसते, तिथे उद्योजक माणसाला व्यवसायाची संधी दिसते. लोकांची अडचण समजून घेऊन ती सोडवता सोडवता एखादा उद्योग उभा राहतो. धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी २० व्या शतकाच्या मध्यावर भारतात नेमकं तेच केलं आहे. त्यांच्या हयातीतच रिलायन्स ही जगातील ‘फॉर्च्युन ५००’ कंपनी बनली होती. पण, तिची सुरुवात ही खिशात ५०० रुपये असताना झाली आहे, असं म्हटलं तर आज काय वाटेल?

१९३२ मध्ये जुनागढच्या चोरवाड गावांत धीरूभाई (Dhirubhai Ambani) यांचा जन्म झाला. वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. तर आई गृहिणी. त्यांच्या गावातील सगळी कुटुंबं त्यांच्यासारखीच गरीब. पण, म्हणून गावातील तरुणांकडे परिस्थिती सुधारण्याची आस होती. बहुतेक तरुण मिळेल तितकं शिक्षण पदरात पाडून घेत थेट आखाती देश गाठायचे. तिथे काम करून कुटुंबाला हातभार लावायचा हा त्या मागचा उद्देश आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिथे जाऊन थोड्याफार तरी प्रमाणात आयात-निर्यातीचा व्यवसाय करायचा, हा सुप्त हेतूही होताच. भारतातील मसाले, कापूस तिथे विकायचा. तिथून महागड्या चैनीच्या वस्तू भारतात आणायच्या हा उद्योग बहुतेक सगळ्या घरात चाले.

(हेही वाचा – Manodhairya Yojana : महिलांच्या मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवली; १० लाखांची मिळणार मदत)

पण, धीरूभाईंकडे (Dhirubhai Ambani) यासाठी एक विशाल दृष्टिकोण होता. लहानपणी जुनागढ संस्थानाविरुद्ध स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढाईत त्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे बंडखोर आणि चळवळ्या स्वभाव जन्मत:च होता. आता दहावी उत्तीर्ण झाल्यावर कुटुंबाची आर्थिक घडी बसवायची असा चंग त्यांनी बांधला. ते एडनला रवाना झाले. तिथे पेट्रोल पंपावर ते काम करत होते. पण, स्वप्न मोठी होती. तिथेच ते रस्त्यावरील चहा पिण्याऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन चहा घ्यायचे. त्यांना तिथे उद्योजकांच्या गप्पांमध्ये रस होता. त्यांच्या भावी उद्योगांची मूहूर्तमेढ इथेच रोवली गेला आणि उद्योजकतेचे संस्कारही इथेच झाले. मसाल्याचा व्यवसाय तर ते करतच होते. पण, त्यापेक्षा मोठं काहीतरी त्यांना खुणावत होतं.

१९५८ मध्ये त्यांचा मुलगा मुकेश १ वर्षांचा असताना त्यांनी एडन सोडलं आणि ते मुंबईत भुलेश्वरला आले. तिथे एका खोलीत त्यांनी संसार थाटला आणि त्याचवर्षी मुंबईत ३५० वर्गफूट आकाराच्या एका जागेत त्यांनी आपला मसाल्याचा उद्योग अधिकृतपणे सुरू केला. त्यांच्या खिशात तेव्हा उद्योगासाठी ५०० रुपये होते आणि त्यातच त्यांनी रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन केली. त्यांचा भर होता हळद, आले यासारखे मसाले पाश्चात्य देशांत विकण्यावर. त्यानंतर त्यांनी आपला मेहुणा चंपकलालच्या मदतीने दीड लाख रुपये गुंतवून एक ट्रेडिंग कंपनी स्थापन केली. या कंपनीला लगेचच हजारो रुपयांचा नफा झाला. अंबानी कुटुंबही तोपर्यंत वाढलं होतं. लहानग्या मुकेशला अनिल, नीता आणि दीप्ती ही आणखी तीन भावंडं घरात आली होती.

(हेही वाचा – Cyrus Poonawalla Net Worth : ९४३ कोटींच्या लिंकन हाऊसचे मालक सायरल पुनावाला यांची संपत्ती किती?)

धीरूभाईंना (Dhirubhai Ambani) उद्योगाचा विस्तार करायचा होता. पण, चंपकलाल यांना त्यासाठी आवश्यक जोखीम पत्करायची नव्हती. त्यामुळे ते व्यवसायातून वेगळे झाले आणि धीरुभाई यांनी आपल्या विस्ताराच्या योजना सुरू ठेवल्या. १९७३ मध्ये त्यांनी एकट्याने रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना केली आणि सुरुवातीला टेक्सटाईल म्हणजे वस्त्रोद्योग क्षेत्रात पाऊल ठेवलं. विमल हा ब्रँड त्यांनी लाँच केला. १९७७ मध्ये रिलायन्सने आपला आयपीओ लाँच केला आणि कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत झाली. ५८,००० गुंतवणूकदारांनी त्या काळात त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. १९९१ मध्ये धीरूभाईंनी हजिरा पेट्रोकेमिकल्स प्रकल्पही सुरू केला. आणि तिथून अंबानी कुटुंबीयांचं उद्योग क्षेत्र पुढे विस्तारत गेलं आहे. धीरूभाईंचा २००२ मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मुलगे मुकेश आणि अनिल यांच्यामध्ये उद्योगाची वाटणी झाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.