तुम्ही मधुमेही आहात, तर आंधळे होऊ शकता…वाचा ही बातमी

109

अलीकडील काळात मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आकडेवारीनुसार, जगभरात 422 दशलक्ष व्यक्ती मधुमेही आहेत, जगभरात दरवर्षी 1.5 मिलियन मृत्यू होतात. जगभरातील 2.6  टक्के अंधत्वासाठी हा आजार कारणीभूत आहे.
दर 4 पैकी 1 व्यक्तीला (विशीपासून ते साठीपर्यंत) निदान न झालेला मधुमेह असतो.

जगातील सर्वाधिक मृत्यू मधुमेहामुळे

या आजारामुळे प्रिव्हेंटेबल (प्रतिबंध करता येण्याजोग्या) अंधत्वाचे प्रमाणही वाढले आहे. रक्त शर्करेचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा जास्त असणे हे अंधत्वाचे थेट कारण नाही, पण मधुमेहामुळे डायबेटिक रेटिनोपथीसारखे डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता वाढते. यामुळे कालांतराने दृष्टी पूर्णपणे जाते. आकडेवारीनुसार, जगभरात 422 दशलक्ष व्यक्ती मधुमेही आहेत, विशेषतः अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जगभरातील मृत्यूंसाठी हे सर्वाधिक प्रमाणात आढळणारे कारण आहे. या आजारामुळे जगभरात दरवर्षी 1.5 मिलियन मृत्यू होतात. जगभरातील 2.6 टक्के अंधत्वासाठी हा आजार कारणीभूत आहे. मुंबईत दर 4 पैकी 1 व्यक्तीला (विशीपासून ते साठीपर्यंत) निदान न झालेला मधुमेह असतो. अनेकदा डोळ्यांच्या समस्येमुळे हा आजार असल्याची जाणीव होते. डायबेटिक आय डिसीजच्या (मधुमेह नेत्र आजार) लक्षणांची माहिती असणे महत्त्वाचे असते. त्यावर वेळीच उपचार केले नाही, तर पूर्ण अंधत्व येऊ शकते. असे नेत्ररोग तज्ज्ञ, डॉ. अगरवाल ग्रुप ऑफ आय हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. एस नटराजन यांनी सांगितले आहे. सुरुवातीच्या टप्प्यावर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. जसजसा हा आजार बळावत जातो, तसतसे धुरकट दिसू लागते, डोळ्यातील जेलीसारखा पदार्थ अधिक पातळ होऊ लागतो किंवा दृष्टीमध्ये काळे डाग किंवा रिकामे भाग निर्माण होतात. जेव्हा हा आजार सौम्य ते मध्यम स्वरुपाचा असतो आणि अचानक दृष्टी निकामी झाली तर त्याला नॉन-प्रोलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपथी (एनपीडीआर) आणि याच्याच पुढील टप्प्याला प्रोलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपथी (पीडीआर) म्हणतात.

(हेही वाचा : उद्याने ठरतायेत मधुमेहींसाठी वरदान!)

डायबेटिक रेटिनोपथीमध्ये असलेले जोखीम घटक खालीलप्रमाणे 

  • मधुमेह अधिक कालावधीपर्यंत असणे
  • रक्तशर्करेवर कमी नियंत्रण
  • उच्च रक्तदाब
  • कोलेस्टरॉलची उच्च पातळी
  • गरोदरपणा

…तर तुम्ही आंधळे होऊ शकता

नेत्ररोग तज्ज्ञ, डॉ. अगरवाल ग्रुप ऑफ आय हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. एस नटराजन म्हणाले, एनपीडीआर टप्प्यात रेटिनामधील रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि डोळ्यांमध्ये द्रवाचा व रक्ताचा स्त्राव सुरू होतो. द्रव मॅक्युला या रेटिनाच्या मध्यभागी असलेल्या भागात पोहोचते. या भागामुळे केंद्रीय दृष्टी मिळते, पण स्त्राव झाल्याने अचानक दृष्टी जाऊ शकते. पुढील टप्प्यावर रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात आणि रक्तपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात नव्या रक्तवाहिन्या तयार होतात. या वाहिन्या अत्यंत नाजूक असतात, पण त्यातून रक्तगळती होऊ शकते आणि ते रक्त रेटिनावर, तसेच बुबुळाच्या केंद्रात असलेल्या जेलीसारख्या पदार्थामध्ये हा स्त्राव होतो. त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर मेंम्ब्रेन आणि स्कार टिश्यू निर्माण होतात. त्यामुळे रेटिना ओढला जातो आणि रेटिना विलग होऊ शकतो.

डोळे नियमितपणे तपासून घ्यावेत

ड्रॉप्स वापरून डोळ्याची बाहुली विस्फारून आणि रेटिनाची चाचणी करून डायबेटिक रेटिनोपथीची वैद्यकीय चाचणी केली जाते. जर बदल आढळून आला, तर एफएफए आणि ओसीटी चाचण्या केल्या जातात आणि या आजाराचे गांभीर्य व तीव्रता समजून घेतली जाते. इजा झालेल्या रक्तवाहिन्यांवर लेझरने उपचार करण्यात येतात. रेटिनाला सूज आल्याचे आढळले, तर सूज उतरेपर्यंत दर महिन्याला इंट्रा-व्हायट्रिअल अँटि-व्हीईजीएफ इंजक्शन्स दिली जातात. जर पुढील टप्पा असेल तर शस्त्रक्रिया केली जाते. डॉ. एस नटराजन शेवटी म्हणाले, सकस आहार, नियमित व्यायाम, वेळेवर औषधे घेणे, रक्तशर्करेवर लक्ष ठेवणे आणि कोलेस्टरॉल व उच्च रक्तदाबावर काटेकोर नियंत्रण ठेवणे यामुळे रेटिनोपथी विकसित होण्याची शक्यता कमी करता येऊ शकते. अजून एक काळजी म्हणजे दर 6 महिन्यांनी डोळे नियमितपणे तपासून घ्यावेत. रेटिनोपथीचे वेळीच निदान व उपचार झाले, तर गंभीर स्वरुपाच्या दृष्टी निकामी होण्याला प्रतिबंध केला जाऊ शकतो आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता भासत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.