मधुमेह(डायबेटीस) आणि उच्च रक्तदाब(बीपी) हे बदलत्या जीवनशैलीशी निगडीत आजार आहेत. या बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांची काळजी घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आहार समुपदेशकाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या १४४ दवाखान्यांमध्ये आहारतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.
महापालिकेचा उपक्रम
मधुमेह व रक्तदाब असल्याने असल्याने प्रत्येक रुग्णाचे स्वतंत्रपणे आहार व जीवनशैलीविषयी समुपदेशन केल्यास या आजारांवर अधिक नियंत्रण ठेवणे शक्य होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने बीट डायबेटीस हा उपक्रम हाती घेतला होता. त्याकरता डाईट असोशिएशन या आहार तज्ज्ञांच्या मान्यताप्राप्त अधिकृत संस्थेमार्फत हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, आता पुढील एक वर्षासाठी तो चालू ठेवला जाणार आहे.
(हेही वाचाः कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज! काय केली तयारी? वाचा…)
पुढील एक वर्षासाठी राबवणार उपक्रम
या मोहिमेंतर्गत १४४ दवाखान्यांमध्ये प्रत्येक महिन्यातून एक भेट यानुसार आहार समुपदेशकांची सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे. या संस्थेला एक वर्षाची मुदत देताना त्यांना १७ लाख २८ हजार रुपयांचा खर्च महापालिकेकडून दिला जाणार आहे. बीट डायबेटीस या उपक्रमात सकारात्मक निष्कर्ष आढळल्याने या संस्थेमार्फत पुढील एक वर्षासाठी हा उपक्रम चालू ठेवणे उचित असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.