कोविड काळात वाढले डिजीटल व्यवहार! अशी आहे कोरोनाविरुद्ध डिजीटल क्रांती

या दशकात डिजीटल तंत्रज्ञानात भारत जगात सर्वात मोठी क्रांती करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.

86

डिजीटल इंडिया… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली देशाच्या विकासासाठी बघितलेलं एक स्वप्न. 1 जुलै 2015 रोजी डिजीटल इंडिया मोहीमेची घोषणा करताना पंतप्रधान मोदी यांनी डिजीटल इंडियाचे महत्त्व पटवून सांगितले होते. व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं अतिशय आवश्यक असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. डिजीटल इंडियाच्या माध्यमातून देशातील प्रत्येकाला सक्षम करण्याचे मोदींनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. आता डिजीटल इंडिया मोहिमेला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. या 6 वर्षांत भारताने डिजीटल युगात असामान्य क्रांती घडवली आहे.

कोविड काळात डिजीटल युगाचे अनेक फायदे आपल्याला जाणवले. या काळात सर्वाधिक पैशांचे व्यवहार हे डिजीटल पेमेंटद्वारे करण्यात आले. 2020मध्ये भारत डिजीटल व्यवहारांत जगात अव्वल स्थानी आला आहे. मार्च 2021मध्ये तर 172.81 लाख करोड रुपयांचे डिजीटल व्यवहार झाले आहेत. 2016-17 या आर्थिक वर्षात 1 हजार 4 करोड रुपयांचे ऑनलाईन व्यवहार झाले होते, ते वाढून 2019-20 या आर्थिक वर्षात ते 5 हजार 475 करोड रुपयांपर्यंत वाढले आहेत.

(हेही वाचाः देशभरात ७३ लाख लसींच्या मात्रा शिल्लक!)

कोविड काळात असाही झाला डिजीटल वापर

कोविड-19शी लढण्यासाठी तंत्रज्ञानाचा भारताने चांगला वापर करुन घेतला. कोविडबाधित रुग्णांची माहिती मिळवण्यासाठी आरोग्य सेतू या जगातील सर्वात मोठ्या कोविड-19 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅपची निर्मिती करण्यात आली. 19.51 करोड भारतीय हे अॅप सध्या वापरत असून, त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या कोविडबाधित रुग्णांची माहिती मिळवण्यासाठी त्यांना या अॅपची मदत होत आहे. तसेच आरटीपीसीआर चाचण्यांचे नमुने गोळा करण्यासाठी आरटीपीसीआर अॅपचीही भारताने निर्मिती केली आहे. 25 एप्रिलपर्यंत 16 करोड लोकांचे नमुने या अॅपद्वारे गोळा करण्यात आले आहेत.

कोविनची निर्मिती

जानेवारी 2021 भारतात लसीकरण मोहिमेला सरकारकडून सुरुवात करण्यात आली. लसीकरणामध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी आणि जास्तीत-जास्त भारतीयांना लवकरात लवकर लस मिळावी यासाठी सरकारने पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचा वापर करुन, डिजीटल इंडियाची दखल जगाला घ्यायला भाग पाडले. जगातील दुस-या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या देशात लसीकरण नोंदणीसाठी कोविन पोर्टलची सरकारकडून निर्मिती करण्यात आली. आतापर्यंत 35 करोड भारतीयांनी यामार्फत लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे नॅनो पार्टिकल कोटेड मास्कची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे.

मोदींनीही व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा डिजीटल इंडियाच्या प्रगतीबद्दल गौरवोत्गार काढले आहेत. आपल्या नातेवाईकांना पैसे पाठवण्यापासून सर्व प्रकारची सरकारी कामे, कर भरणा यांसारखी अनेक कामे सध्या डिजीटली होत आहेत.

तसेच पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 10 करोड पेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांनच्या अकांऊंटवर 1 लाख करोड रुपये जमा करण्यात आले आहेत. या दशकात डिजीटल तंत्रज्ञानात भारत जगात सर्वात मोठी क्रांती करेल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.