Diwali Padwa 2022: दिवाळी पाडवा ‘या’ दिवसाचे काय आहे महत्त्व आणि इतिहास?

135

अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे. बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.  कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते.

काय आहे इतिहास

बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. बलीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले.

‘वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्या पायाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने ‘‘तिसरा पाय कोठे ठेवू ?’’, असे बलीराजास विचारले. त्यावर बलीराजा म्हणाला, ‘‘तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे’ असे ठरवून वामनाने, ‘‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्याला यमयातना होऊ नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा.’ ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला ‘बलीराज्य’ असे म्हणतात.

महत्त्व

दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.

असा साजरा करा हा सण

या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याला नैवेद्य दाखवला जातो; म्हणजेच त्याच्या क्षुधा-तृष्णा शांत केल्या जातात. बलीप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.