दिवाळी सणाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लुकलुकणारे दिवे, दारापुढे कंदील, सुबक रांगोळी, फराळ, रोषणाई करून देशभर मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळी पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिवशी ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, ही प्रार्थना केली जाते. या शुभ दिवशी पत्नी पतीचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करावयाची असते. त्यासाठी पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते.
बलिप्रतिपदेचा इतिहास
राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. एके दिवशी यज्ञ केल्यानंतर भगवान विष्णूंनी वामनावतार धारण करून बटुवेशात येऊन दान मागितले, तेव्हा बळीराजाने दान देण्याची तयारी दर्शवली. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. असे, वरदान दिले. म्हणून ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.
पाडव्याचा मुहूर्त
शुभ मुहूर्त : सकाळी 06:36 ते 08:47
सायंकाळी 03:22 ते 05:33