दिवाळीविशेष : जाणून घ्या नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

81

दिवाळी सणाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लुकलुकणारे दिवे, दारापुढे कंदील, सुबक रांगोळी, फराळ, रोषणाई करून देशभर मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवशी श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते आणि म्हणूनच प्रजाजनांनी संपूर्ण नगरीत दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते, असे सांगितले जाते. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत दिवाळी साजरी केली जाते.

नरक चतुर्दशी

भगवान श्रीकृष्णाने नरकासूर या राक्षसाचा वध केला. श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे. पहाटे लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून स्नान केले जाते. यानंतर कारीट फोडून कुटुंबासमवेत एकत्र बसून दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला जातो.                                                                                             शुभ मुहूर्त  : पहाटे ५:०३ ते ६:३८

लक्ष्मीपूजन

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. अश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. यंदा लक्ष्मी पूजन हे ४ नोव्हेंबर २०२१ या दिवशी आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा संध्याकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत आहे. आता लक्ष्मी पूजन नेमके कसे करावे ते जाणून घेऊया.

१. लक्ष्मीपूजन करताना चौरंग घ्यावा, चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा व त्याभोवती रांगोळी काढावी.
२. चौरंगावर अक्षतांचे स्वस्तिक काढून त्यावर कलश ठेवावे. कलशावर नारळ ठेवून, कमळाचे फूल व लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी.
३. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिला, लक्ष्मी मानून तिच्यावर हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
४. लक्ष्मी पूजनाच्या वेळी दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात तसेच लक्ष्मीसमोर अखंड ज्योत तेवत राहील याची योग्य ती काळजी घ्यावी.
५. देवपूजा करून नैवेद्य अर्पण करावा.

दिवाळी पहाटचे आकर्षण

नरक चतुर्दशीच्या पहाटे अभ्यंगस्नान करून दिवाळी पहाट साजरी केली जाते. उत्साहाने फटाके फोडून, दारासमोर रांगोळी, कुटुंबासमवेत फराळ करून हा दिवस साजरा केला जातो. विविध ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.