कोविडच्या जागतिक महामारीनंतर पहिली दिवाळी आता मोकळेपणाने साजरी करण्यास प्रत्येक जण तयारीला लागला आहे. दिवाळी आणि त्यादिवशी होणाऱ्या दिवाळी पहाटेच्या संगीतमय कार्यक्रमांनी या सणाची आणि दिवसाची सुरुवातही प्रसन्न आणि आनंदमय केली जाते. मागील काही वर्षात दिवाळी पहाटेच्या या कार्यक्रम आयोजनाचे प्रमाण कमी झाले असून त्यातच कोविडमुळे आयोजनात आता फारसे स्वारस्य राहिलेले नाही. तरीही यंदा भाजपने या प्रथा आणि परंपरा पुढे सुरू ठेवल्या आहेत. दादर, विलेपार्ले आणि मुलुंड आदी भागांमध्ये या दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
राशी चक्रकार-हास्य सम्राट यांची जुगलबंदी
मुलुंड सेवा संघाच्यावतीने भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात राशी चक्रकार शरद उपाध्ये आणि हास्य सम्राट अशोक नायगावकर यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. संकल्पना आणि संयोजक दिगंबर प्रभू यांची असून दत्ता मेस्त्री, माधुरी करमरकर,निमिष कैकाडी हे गायक आहेत. तर स्मिता गवाणकर यांचे सूत्र संचालन करणार आहेत. हा कार्यक्रम मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता होणार आहे.
भाजपच्या माहीम अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी शुक्रवारी दिनक्रम ५ नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क मधील स्वतंत्रवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम पहाटे ६ वाजता होणार आहे. स्वर निर्मित दिवाळी पहाटची संकल्पना संयोजन हे प्रिया साटलेकर यांचे असून केतकी भावे- जोशी, दत्तात्रय मेस्त्री, सोनाली कर्णिक हे गायक आहेत, तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्मिता गवाणकर हे करणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहेत.
विलेपार्लेत सांगितीक मैफिल
तर विलेपार्ले येथील भाजप नगरसेवक अभिजित सामंत अटल सेवा केंद्र आयोजित प्रभाती सूर नभी रंगती या दिवाळी पहाट संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम पटांगण, हनुमान रोड विलेपार्ले पूर्व येथे आयोजित या कार्यक्रमात नचिकेत देसाई, अर्चना गोरे, मंदार आपटे, मधुरा देशपांडे यांची गाणी ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना विनीत गोरे आणि संयोजन अर्चना गोरे यांचे आहे. विशेष म्हणजे अभिजित सामंत यांनी कोविड काळातही दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन द्वारे केले होते. त्यामुळे सामंत यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाची प्रथा खंडित केली नव्हती.
(हेही वाचा- मुंबईकरांनो, वाचा कोरोना लसीकरणासंदर्भात महत्वाची बातमी)
बोरिवलीमध्येही रंगणार दिवाळी पहाट
यंदाचे हे वर्ष, जेष्ठ गायक स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी, सुप्रसिद्ध कवयित्री व गीतकार स्व. शांताबाई शेळके आणि सुप्रसिद्ध कवी, गीतकार प्राध्यापक वसंत बापट या तिन्ही महान कलावंतांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधत ह्या तिन्ही मान्यवरांना अभिवादन करून त्यांच्याच गीतांची स्वरमैफल ‘त्रिवेणी संगम’ या नावाने ६ नोव्हेंइबर २०२१ रोजी बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात पहाटे ६.३० वाजता साकारत आहे. ‘अनुबोध’ व ‘नवचैतन्य’ या दोन्ही संस्थांनी यंदाही ‘त्रिवेणी संगम’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्री जी ग्रुपच्या वतीने व अनुबोध आणि अनवचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजक भूषण पाटील, सुबोध खेर, अनुप चलकरण, मनोज नायर व अनिल परब यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community