बऱ्याच जणांना आपल्या घरात पाळीव प्राणी पाळण्याची हौस असते. पाळीव प्राण्यांच्या सहवासात काहीं लोकांना आपला वेळ घालवायला खूप आवडत असते. त्यामुळे कित्येक लोक त्यांच्या घरात कासवांपासून माशांपर्यंत तसेच मांजर, कुत्रे, पक्षी, घरात पाळत असतात. कोरोना दरम्यान, अनेकांनी विरंगुळा म्हणून पाळीव प्राणी घेतल्याचेही सांगितले जात आहे. मात्र जर आता तुम्हाला तुमच्या घरात एखादं पाळीव प्राणी विशेषतः कुत्रा आणायचा असेल तर तुम्हाला पालिकेची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे. हे अगदी खरं आहे.
श्वान पाळायचा असेल तर…
येत्या नव वर्षात औरंगाबाद महापालिकेने श्वान प्रेमींना श्वान पाळायचा असल्यास त्यासाठीचा परवाना अनिवार्य केला आहे. यासह अनेक नागरिक नियमानुसार, महापालिकेकडून श्वान परवाना न घेता आपल्या घरात श्वान पाळतात. त्यामुळे महापालिकेने 1 जानेवारी 2022 पासून परवाना नसलेले श्वान जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा- आता आरटीपीसीआर चाचणी अवघ्या ३५० रुपयांत)
महापालिकेकडून श्वान पाळण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत औरंगाबाद महापालिकेने 3 हजार श्वान परवाने दिले. एक वर्षाची मुदत संपल्यानंतर अनेकजण नूतनीकरणासाठी येत नाहीत. नवीन परवाना घेण्यासाठी 750 रुपये शुल्क आकारले जाते तर नूतनीकरणासाठी 500 रुपये घेतले जातात. शहरात किमान 10 हजार नागरिकांकडे अशा प्रकारचा परवाना नाही, असा महापालिकेचा प्राथमिक अंदाज आहे.
परवान्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम तारीख
येत्या 31 डिसेंबर 2021 पर्यंत काढून घ्यावेत तसेच ज्यांच्याकडे परवाना असेल त्यांनी त्याचे नूतनीकरण करता येणार आहे. यासंदर्भातील अवाहन देखील पालिकेने केले आहे. जर या नियमांचे पालन नागरिकांनी केले नाही तर त्या नागरिकांचा श्वान जप्त करण्यात येईल, असेही सांगितले जात आहे.