आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतातील डोळ्यांच्या रुग्णालयाचे सर्वात मोठे संपर्क जाळे असलेल्या डॉक्टर अगरवाल्ज आय हॉस्पिटलच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये सर्वच वयोगटातील महिलांकरता मोफत नेत्र तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या समस्यांचा समावेश
या रुग्णालयामार्फत डोळ्यांशी संबंधित काही विशिष्ट आजार आणि विकारांच्या तपासणीसाठी विशेष व्यवस्था केलेली आहे. सामान्यत: महिलांमध्ये अशाप्रकारचे आजार आणि विकारांचा टक्का अधिक जाणवतो. तसेच अलीकडच्या काळात त्यात वाढ झालेली आहे. त्यात मॅक्युलर डिजनरेशन, ऑक्युलर मॅनीफेस्टेशन ऑफ ऑटोईम्युन डिसीज, मोतीबिंदू, डोळे कोरडे होणे, ग्लोकोमा, दृष्टी अधू असणे, थायरॉईड संलग्न डोळ्यांचे विकार आणि रिफ्रेक्टीव्ह एरर्स असे वयोमानानुसार उद्भवणाऱ्या समस्यांचा समावेश असतो. महिलांमधील नेत्र आजारांची वाढती जोखीम लक्षात घेता, सजगता सत्राचे आयोजन रुग्णालयातर्फे करण्यात येणार आहे, जेणेकरून विकारांवर अंकुश राहील, महिलांना या सत्रादरम्यान गर्भारपणातील हार्मोनची वाढती पातळी, रजोनिवृत्ती आणि ऑटोईम्युन डिसीज संवेदनक्षमता याविषयी माहिती दिली जाईल.
डोळे असे जपावेत
याविषयावर आपले विचार मांडताना डॉक्टर अगरवाल्ज आय हॉस्पिटल, मुंबईच्या वरिष्ठ सल्लागार डॉक्टर कविता राव, म्हणाल्या की, “तुमचे लिंग कोणते या फरकाचा ऑक्युलर स्ट्रक्चर, जीन एक्सप्रेशन, टियर कंपोझिशन आणि आऊटपूट तसेच डोळ्यांची इतर कार्ये (ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडेल) यावर प्रभाव पडत नाही. त्यामुळे महिलांसाठी नियमित नेत्र तपासणी फारच महत्त्वपूर्ण ठरते. कोणतेही आहारपूरक घेण्यापूर्वी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. तसेच जेव्हा महिला वर्ग घराबाहेर असतो, तेव्हा त्यांनी यूव्ही किरणांशी थेट संपर्क टाळणारे चष्मे आणि संरक्षक हॅटचा वापर केला पाहिजे. तसेच कोणत्याही पद्धतीचे डोळ्यांशी संबंधित सौंदर्य प्रसाधन वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. त्याचप्रमाणे डोळ्यांमधील संसर्ग टाळण्यासाठी डोळ्यांची सौंदर्यप्रसाधणे आणि कॉंटॅक्ट लेन्स जपून वापरली पाहिजेत.”
…म्हणून दृष्टीदोष निर्माण होतो
गर्भधारणा आणि डोळ्यांचे आजार यांच्यामधील परस्पर संबंधाविषयी बोलताना डॉक्टर कविता म्हणाल्या की, “गर्भधारणेच्या काळात शरीरातील पाणी पातळीत वाढ होते. परिणामी कॉर्निया जाड होतो आणि डोळ्याचा पुढील पृष्ठभागात बदल घडतात. या कालावधीत डोळ्यांमधील दाबही काही प्रमाणात खालावतो. गर्भवती महिलेत गेस्टेशिनल डायबेटीसची तक्रार सुरू होते. गर्भारपणात शरीरातील साखरेचे प्रमाण भरपूर वाढते. काही महिलांमध्ये डायबेटीक रेटीनोपॅथीची तक्रार सुरू होते. डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांना धक्का लागल्याने, दृष्टीसंबंधी समस्या निर्माण होतात. गर्भधारणेच्या काळात डोळे कोरडे होण्याची समस्या देखील वाढते आणि प्रखर उजेड सहन होत नाही. संततीनियमनाची औषधे घेतल्याने, त्यातील हार्मोनपायी रक्तवाहिन्यांशी संबंधित बदल होतात, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे दृष्टीदोष निर्माण होतात.
( हेही वाचा :ओबीसी आरक्षणावर राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय )
गर्भधारणेत पुरेसा आहार घ्यावा
“गर्भवती महिलांनी संपूर्ण शरीराचे पोषण करणे महत्त्वाचे आहे, त्यात डोळ्यांचादेखील समावेश होतो. महिलांनी भरपूर पालेभाज्या, फळं, सुका मेवा आणि उच्च ओमेगा असलेले मासे आहारात घ्यावेत. त्यांनी नियमित पुरेसे पाणी शरीरात राखले पाहिजे,” अशी माहिती डॉक्टर कविता यांनी दिली. डोळ्यांचे आरोग्य आणि रजोनिवृत्ती यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल बोलताना डॉक्टर कविता म्हणाल्या की, मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉज या काळात शरीराचा रजोनिवृत्तीकडे नैसर्गिक प्रवास सुरू होतो, सामान्यपणे यामध्ये इस्ट्रोजेन या हार्मोन गटाचा हातभार लागतो. इस्ट्रोजेनमुळे कॉर्निया, डोळ्याला स्वच्छ ठेवतो, संरक्षित बाह्य आवरण देतो, प्रकाशाकडे लक्ष केंद्रित करण्याची लवचीकता वाढते.
Join Our WhatsApp Community