यंदा दिवाळीत दिसणार सूर्यग्रहण!

138

यावर्षी दिवाळीत मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. दीपावलीनिमित्त पृथ्वीवर दीपोत्सवाची रोषणाई केली जाईल आणि आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, आश्विन अमावास्या मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असून ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण यूरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे. हे सूर्यग्रहण ग्रहणचक्र (सॅरोस) १२४ क्रमांकाचे आहे.

( हेही वाचा : पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास CBI करणार; महाराष्ट्र सरकारची मान्यता)

मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी ४-४९ वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहण मध्य सायं. ५-४३ वाजता होईल त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकून टाकेल. पश्चिम आकाशात हे सुंदर दृश्य पाहता येईल. नंतर ग्रहण सुटण्याआधीच सायं. ६-०८ वाजता सूर्यास्त होईल. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. महाराष्ट्रातील पश्चिमेस सागर किंना-यावरून पाहिल्यास सागरात ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. छायाचित्रकारांना ही एक पर्वणीच असेल. भारतातून वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे सूर्यग्रहण दिसेल.

गावाचे नाव ग्रहण प्रारंभ सूर्यास्त
पुणे सायंकाळी ४.५१ सायंकाळी ६.३१
नाशिक सायंकाळी ४.४७ सायंकाळी ६.३१
नागपूर सायंकाळी ४.४९ सायंकाळी ६.२९
कोल्हापूर सायंकाळी ४.५७ सायंकाळी ६.३०
संभाजीनगर सायंकाळी ४.४९ सायंकाळी ६.३०
सोलापूर सायंकाळी ४.५६ सायंकाळी ६.३०

सूर्यग्रहण हे साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण ग्रहण चष्म्यातूनच पहावे. किंवा चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन त्यामध्ये पहावे. या सूर्यग्रहणानंतर १४ दिवसांनी मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे.

दीपावली आणि सूर्यग्रहण

यावर्षी दीपावलीमध्ये जरी सूर्यग्रहण येत असले तरी मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणताही सण येत नाही. यावर्षी शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी गोवत्स द्वादशी- वसुबारस आहे. शनिवार २२ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी , धन्वंतरी पूजन आहे.रविवार २३ ऑक्टोबर रोजी सण नाही. सोमवार २४ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान आणि लक्ष्मी- कुबेरपूजन आहे. मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण दिसणार आहे.बुधवार २६ ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा, भाऊबीज एकाच दिवशी आले आहेत. कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर हा दीपावलीचा सण पृथ्वीवर आणि आकाशात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.