सध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी पावसाचा आणि दोन दिवस असलेल्या ढगाळ वातावरणाचा हापूस आंब्यांच्या पीकावर परिणाम झाला आहे, असे असले तरी मात्र मे महिन्यात हापूस आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना यंदा मनसोक्त हापूसवर ताव मारता येणार आहे.
मे महिन्यात सर्वत्र उपलब्ध
यंदा वातावरणाचा फटका हापूसला बसला, त्यामुळे एक महिना उशिराने मोहोर आला. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या कालावधीत अवकाळी पावसामुळे मोहोरासह बारीक कैरीचे नुकसान झाले. जानेवारी महिन्यापासून, तुरळक प्रमाणात आंबा बाजारात पाठवण्यास प्रारंभ केला. चालू महिन्यात ही आवक आणखी वाढली आहे. पुढील महिन्यात आंबा उत्पादनाचे प्रमाण पुन्हा थोडे खाली येईल, पण मे महिन्यात सर्वत्र तो उपलब्ध होईल.मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील वाशी बाजार समितीमध्ये रत्नागिरी, देवगड या दोन्ही ठिकाणांहून दररोज सुमारे पाच हजार पेटी जात होती. त्यापैकी ३० टक्के आंबा रत्नागिरीतील होता. सध्या रोजच्या १६ ते २० हजार पेटी कोकणातून वाशीमध्ये जात आहे. त्यात ४० टक्के आंबा हा रत्नागिरीतील आहे.
( हेही वाचा :मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला परवानगी; पालिका निवडणुकीसाठी शक्तिप्रदर्शन )
आखाती देशांत मोठी मागणी
आखाती देशांमध्ये या हापूस आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. सर्वाधिक आंबा सिंधुदुर्गचा आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे आंबा नियार्तीसाठी विविध समस्यांचा सामना करावा लागला. आखाती प्रदेशातील मागणीमुळे दर टिकून आहेत. उष्मा सुरू झाल्याने, आंबा लवकर तयार होऊन बाजारातील आवक वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये पवित्र रमजान सुरू होणार आहे. त्यामुळे आखाती प्रदेशातून आंब्यासाठी मागणी वाढणार आहे.
Join Our WhatsApp Community