मस्त्यगंधाची एक्झिट…

107
मुंबई – मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन झाले. कवयित्री, गायिका, लेखन अशा क्षेत्रात गती असलेल्या आशालता यांनी अजरामर अशा भूमिका साकारल्या. मत्स्यगंधा या नाटकातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्याने अजरामर झाली.
कलेचा वारसा नसतानाही कलाक्षेत्रात आगमन 
आशालता वाबगांवकर या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपटअभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या. मुंबईत ३१ मे १९४१ रोजी आशालता यांचा जन्म झाला. गिरगावातील सेंट कोलंबो हायस्कूल या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्र विषयात एमए केले. घरी नाटक, संगीत कला असे कोणतेही वातावरण नव्हते. तरीही त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेत असताना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली.
संगीत संशयकल्लोळ नाटकातून रंगभूमीवर पदार्पण  
अपने पराये या हिंदी चित्रपटात त्यांनी सर्वप्रथम काम केले. या कामाबद्दल त्यांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले. रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटक होते. दि गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या संगीत संशयकल्लोळ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचे गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शक होते. संस्थेने स्पर्धेत सादर केलेल्या संशयकल्लोळ, शारदा व मृच्छकटीक या तिन्ही संगीत नाटकांत अनुक्रमे रेवती, शारदा व वसंतसेना या भूमिकांसाठी दर वर्षी आशाताईंना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. पं. गोविंदराव अग्नींनी त्यांची सर्व गाणी पारंपरिक पद्धतीने बसवली होती. त्यांची वसंत सेनेची भूमिका पाहूनच प्रा. वसंतराव कानेटकरांनी हीच माझी मत्स्यगंधा, असे उद्गार काढले होते.
मस्त्यगंधा नाटकाने यशाचे शिखर दाखवले 
आशालता यांच्या अभिनय कारकीदीर्तील त्यांचे मत्स्यगंधा हे नाटक मैलाचा दगड ठरले. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी साकारलेली मत्स्यगंधा आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नाटकातील त्यांनी गायलेली गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा ही नाट्यपदे गाजली. वसंत कानेटकर लिखित आणि मा. दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे होते. नाटकातील संगीताने पं. अभिषेकी यांनी नाट्यसंगीताचा बाज बदलला, त्याला नवे रूप दिले. नाटकातील सत्यवती (मत्स्यगंधा)च्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. अठरा वर्षांची अल्लड तरुणी, पराशराकडून फसविली गेलेली आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारी राजकन्या आणि आयुष्य पूर्णपणे हरलेली राजमाता अशा १८ ते ७० वर्षे वयोगटातील विविध छटा यातून सादर करायच्या होत्या. ते एक आव्हानच होते. १ मे १९६४ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहात नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेले नाटक दुपारी अडीचच्या सुमारास संपले. या नाटकाने त्यांना खूप नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवून दिली. मत्स्यगंधाच्या यशानंतर नाटक पूर्णवेळ करायचे असे ठरवून त्यांनी नोकरी सोडली.
आजवरची नाटके आणि चित्रपट 
दि गोवा हिंदू असोसिएशन, चंद्रलेखा, मुंबई मराठी साहित्य संघ, माऊली प्रॉडक्शन, कलामंदिर, आयएनटी, आदी नाट्यसंस्थांमधून त्यांनी आजवर पन्नासहून अधिक नाटके केली आहेत. या सर्व नाटकांचे मिळून पाच हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत.रायगडाला जेव्हा जाग येते, मदनाची मंजिरी, गारंबीचा बापू, गुडबाय डॉक्टर, तरुण तुर्क म्हातारे अर्क, स्वामी, गरुडझेप, तुज आहे तुजपाशी ही त्यांची काही गाजलेली नाटके. तर सावित्री, उंबरठा, पुढचं पाऊल, माहेरची साडी, नवरी मिळे नव-याला, एकापेक्षा एक, आत्मविश्वास अशा शंभरहून अधिक मराठी चित्रपटही त्यांच्या नावावर आहेत. मराठी नाटक आणि चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटाचा पडदाही गाजविला. दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.