कोरोनाच्या ब्रेकनंतर राज्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांचा बुधवार, १ डिसेंबर हा पहिला दिवस आहे. जरी मुंबई, पुणे, नाशिक येथे शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार असल्या तरी ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी जून महिन्याच्या १५ तारखेदरम्यान हलक्या पावसाने सुरू होणा-या शाळांच्या वेळीचा फील आज १ डिसेंबर रोजी आला आहे. अमरावती, नंदुरबार, सातारा, सांगली या जिल्ह्यांत प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दोन वर्षांपासून बंद असणाऱ्या शाळा पुन्हा एकदा लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत अनेक तज्ज्ञांचे मत जाणून घेत अंतिम निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला पावसाने देखील हिरवा कंदील दाखवत, जून महिन्यात शाळा सुरू होताना जसा रिमझिम पाऊस बरसतो, अगदी त्याचप्रमाणे सकाळपासून राज्यात रिमझिम पावसाची सुरूवात झालेली आहे.
पहिल्या दिवसाचा फील
जून महिन्यात शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी पावसामुळे पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेच्या धावपळीत विद्यार्थ्यांसह पालकांना अनियमित पावसामुळे जून महिन्याच्या पावसाचा फील मिळाला. शाळा सुरू होणार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, अशावेळी अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शाळेचा पहिला दिवस जून महिन्यासारखा भासला.
( हेही वाचा : मुंबईकरांनो सावधान! आगामी दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता )
अवकाळी पावसाचे कारण
आग्नेय अरबी समुद्रापासून ते लक्षद्वीपपर्यंत वा-यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे अरबी समुद्रातील पूर्व भागात महाराष्ट्राजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हवामान विभागाकडून देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community