जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरीत महोत्सव

124

रत्नागिरीतील पर्यटनविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, जिल्हा प्रशासन आणि कोकण विभाग पर्यटन संचालयालयातर्फे येत्या २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात होणार आहे.

( हेही वाचा : मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या आड येणाऱ्या अनधिकृत केबल्स, लटकलेल्या तारा तात्काळ हटवा!)

पर्यटनाचा पुनर्विचार या संकल्पनेवर हा जागतिक पर्यटन दिन साजरा करणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेले असल्यामुळे तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रकिनारे, श्रीक्षेत्र गणपतीपुळ्यासारखे जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटनस्थळ तसेच गड, किल्ले, सह्याद्रीचे खोरे, आकर्षक धबधबे अशी पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक पर्यटनस्थळे आहेत. देश-विदेशातून आता फार मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत असतात. त्याचप्रमाणे येथे सोयीसुविधा निर्माण होण्यासाठी, स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती व स्थानिक कलांना वाव देण्यासाठी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हावा, स्थानिक स्तरावर व शासन स्तरावर वेगवेगळ्या सोयीसुविधांसाठी पर्यटन दिनातून मागण्या करण्यात येतात. अनेक सोयीसुविधा जिल्ह्यामध्ये आता निर्माण होत आहेत. शासनही पर्यटन विकासासाठी रत्नागिरी जिल्ह्याकरिता वेगवेगळ्या योजना राबवत आहे. संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन चळवळ आता उभी राहत आहे. त्यामुळे नवनवीन पर्यटन व्यवसाय तयार होत असून व्यावसायिकांना अनेक मान्यवरांमुळे मार्गदर्शन मिळत आहे. यावेळच्या महोत्सवातही अशा विविध संधी उपलब्ध होणार आहेत.

या परिषदेस उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, पर्यटन संचालनालय कोकण विभागचे हणमंत हेडे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार णार आहेत. या वेळी पर्यटन क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. पर्यटनप्रेमी व नवीन तरुण व्यावसायिक, टुरिस्ट गाइड व जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.