राज्यात १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत सलग ६१ दिवसांसाठी शासनाने खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीला बंदीचे आदेश दिल्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. मासेमारी बंदीच्या आदेशानंतर अवघ्या पाच दिवसातच राज्यात मासळीचा तुटवडा जाणवू लागला आहे. उरणच्या बाजारात पापलेट, सुरमई व कोळंबीचे दर जवळपास ३०० ते ४०० रुपयांनी वधारले आहेत तसेच इतर मासे सुद्धा महागले आहे.
( हेही वाचा : ‘पाक’चा डाव BSF ने उधळला! ड्रोनमधून भारतात पाठवले होते ‘टिफिन बॉम्ब’ )
राज्यात मासळीचा तुटवडा
पावसाळी मासेमारीवर बंदी लागू झाल्यानंतर दोन दिवसातच मासळीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे मासळीच्या तुटवडा जाणवत आहे. मासळीची आवक घटल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही मासळीचे भाव चांगलेच कडाडले असल्याची माहिती मासळी व्यावसायित हेमंत गौरीकर यांनी दिली आहे.
मासळी व्यावसायिकांची माहिती
खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने आता स्थानिक बाजारात मांदेली, बोंबील, निवठ्या, भिलजी, कोळीम, बळा, चिंबोरी, ढोमी, चिवणी, कोळंबी, बांगडे इत्यादी आणि तळ्यातील गोडी मासळी आणि सुकी मासळी बाजारात उपलब्ध झाली आहे. मासेमारी बंदीच्या काळात राज्याबाहेरून कोलकता ते कन्याकुमारी किनारपट्टीवरील तसेच गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल येथून कंटेनरद्वारे मासळी विक्रीसाठी मुंबईत आणली जाते. परंतु या परराज्यातून येणाऱ्या चांगल्या प्रतीच्या मासळीचे भाव सुद्धा सामान्यांच्या आवक्याबाहेर असल्याची माहिती मासळी व्यावसायिकांनी दिली आहे.