एकेकाळचा मुंबई बंदराचा दीपस्तंभ पुन्हा झाला प्रकाशमय

मुंबई बंदराचा दीपस्तंभ समजला जाणारा ‘फ‍िट्झगेराल्‍ड दिवा व कारंजा शिल्‍पाकृती’चे मुंबई महापालिकेच्‍या पुरातन वास्‍तू जतन विभागाने संवर्धन व सुशोभीकरण केले आहे. जगातील एकमेव अशा या पुरातन व सुंदर शिल्‍पाकृतीची मेट्रो सिनेमाजवळील वासुदेव बळवंत फडके चौकात नव्याने उभारणी करण्यात आली आहे.

ऐतिहासिक शिल्पाकृती

ओतीव लोखंडातील जगातील एकमेव अशा व १५३ वर्षे पुरातन शिल्‍पाकृतीचे महापालिकेने संवर्धन व सुशोभीकरण केले आहे. सुमारे ४० फूट उंच कारंजा व ७ फूट उंच दिवा असलेल्या या पुरातन शिल्पाकृतीचा जीर्णोध्दार मुंबई महापालिकेच्‍या पुरातन वास्तू जतन विभागाने केला आहे. अतिरिक्त आयुक्त(पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिल्पाकृती नव्‍याने उभारण्‍यात आली आहे. याचे लोकार्पण राज्‍याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्‍हा पालकमंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्ते रविवारी सायंकाळी करण्‍यात आले.

(हेही वाचाः ‘दि ललित’ पंचतारांकित हॉटेलमधील लसीकरणाची ऐशीतैशी)

या लोकार्पण प्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्‍थानिक खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री सचिन अहिर, महापालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, स्‍थानिक नगरसेविका सुजाता सानप, ‘ए’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव, पुरातन वास्‍तू जतन विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सावंत यांच्‍यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोविड संसर्ग प्रतिबंध नियमांचे पालन करुन, कोणताही समारंभ आयोजित न करता अगदी मोजक्‍याच मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत हे लोकार्पण करण्‍यात आले.

मुंबई इलाख्याचे गव्हर्नर सर सॅम्युअल फिट्झगेराल्ड यांच्या गौरवार्थ

सन १८६०च्या दशकात सर रुस्तमजी जीजीभॉय या कापसाच्या प्रसिद्ध व्यापा-याने इंग्लंडमधील नॉर्थहॅम्प्टन शहराच्या मार्केट स्क्वेअरमध्ये उभ्या असलेल्या आयझॅक फाउण्टनप्रमाणेच मुंबई शहरासाठी सुंदर दिवा व कारंज्यांची मागणी ‘मे. एडवर्ड हॅरिसन बारवेल आणि कंपनी’ यांच्याकडे नोंदवली. कालांतराने त्यांच्या विश्वस्तांकडून, तत्कालीन एस्प्लनेड फी फंड समितीने १४ हजार रुपयांना ते खरेदी केले. १८६७ मध्ये मुंबई इलाख्याचे गव्हर्नर सर सॅम्युअल फिट्झगेराल्ड यांच्या गौरवार्थ हे अप्रतिम नक्षीकाम असलेले, मिश्र धातूसह ओतीव लोखंडाचे दिवा व कारंजे उभारण्यात आले. या सुंदर शिल्पाच्या मधोमध ४० फूट उंचीवर गॅसबत्तीने पेटणारा दिवा व सभोवती चार दिवे होते.

मुंबई बंदराचा दीपस्तंभ म्हणून ओळख

१८८०च्या दरम्यान मुंबई लगतच्या समुद्रातील जहाजे या दिव्याला मुंबई बंदराचा दीपस्तंभ समजत असल्यामुळे मध्यरात्रीनंतर हा दिवा बंद करण्‍यात येत असे. या नक्षीदार कारंज्याला त्‍यावेळी मुंबई जलकामे विभागातर्फे विहार तलावातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. सन १८६७ मध्ये धोबीतलाव येथे हे सुंदर शिल्‍प उभारले गेले. तेव्‍हापासून म्‍हणजे १८६७ ते १९११ पर्यंत रॉबर्ट मनी शाळेसमोर म्‍हणजे आताच्या जेरमहल इमारतीसमोर हे कारंजे उभे होते.

(हेही वाचाः मुंबईतील वाहनतळ प्राधिकरणाला आता होणार सुरुवात)

डॉ.भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या प्रांगणात ही शिल्पाकृती

१९२० दरम्यान वाढलेल्या ट्रामच्या जाळ्यामुळे या कारंज्‍याला प्रथम मेट्रो सिनेमासमोर स्थलांतरित करावे लागले. नंतर १९६०च्या दशकात मात्र वाहतुकीची सुविधा व अपघात प्रतिबंध या कारणासाठी ही शिल्‍पाकृती हलवून त्‍याची रवानगी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या प्रांगणात करण्‍यात आली. इंग्लंडमधील आयझॅक फाउण्टन सन १९६२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आले. परंतु मुंबई महापालिकेने पुरातन वास्‍तू जतन विभागाच्‍या माध्‍यमातून या शिल्‍पाकृतीचे संवर्धन करुन, १५३ वर्षांनी पुन्हा त्याच जागी म्‍हणजे वासुदेव बळवंत फडके चौकात नव्याने उभारले आहे.

असे करण्यात आले संवर्धन

याचे संवर्धन करताना पुरातन वास्‍तू जतन विभागाने वेगवेगळ्या तज्‍ज्ञांची मदत घेताना थेट इंग्‍लंडमध्‍येही संपर्क साधला. तपशीलवार संदर्भ शोधून, सर्व अभ्‍यास करुन, सदर कलाकृतीचे लहान मोठे असे ५८० भाग पूर्वीच्या संदर्भानुसार त्याच ओतीव लोखंडाच्या विटा तयार करुन साचे बनवून संवर्धन करण्यात आले. या संवर्धन व सौंदर्यीकरण कामासाठी मेसर्स स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट्स यांची नियुक्‍ती करण्‍यात आली होती. तसेच पंकज जोशी यांनी सल्लागार म्‍हणून तर दीपक पौनिकर व माधवी पेंढारकर यांनी शिल्पकार म्‍हणून या जीर्णोद्धारामध्‍ये योगदान दिले आहे. मिश्र धातूसह ओतीव लोखंडामध्‍ये नक्षीकाम असणारी जगातील ही आता एकमेव अशी शिल्‍पाकृती असून, त्‍याच्‍या जीर्णोद्धारासह पुनर्स्‍थापनेमुळे मुंबई महानगराच्‍या व  मुंबई महापालिकेच्‍या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

(हेही वाचाः ‘बॉम्बा’बॉम्बः मंत्रालय उडवण्याची धमकी! परिसरात खळबळ)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here