डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेल्या धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाला आता नवनवे पाहुणे भेट देत आहेत. हे पाहुणे म्हणजे मुग्धबालक, तिरंदाज, मलबारी राखी धनेश या तिन्ही पक्ष्यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्र निसर्ग उद्यानाला भेट दिली. या तीन पक्ष्यांच्या भेटीने ३७ एकरावर फुललेल्या फळबागा, विविध प्रजातीच्या झाडी-झुडपांचा बहर वाढला असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. निसर्ग उद्यानातील कर्मचाऱ्यांनाच या तिन्ही पक्ष्यांचे गेल्या दोन महिन्यात दर्शन झाले. हे तिन्ही पक्षी मुंबईकर असले तरीही त्यांनी याआधी कधीही निसर्ग उद्यानाला भेट दिली नव्हती.
पक्ष्यांच्या विविध प्रजाती
आतापर्यंत निसर्ग उद्यानाला १२५ पक्ष्यांच्या विविध प्रजातींनी भेट दिली आहे. त्यात ५० टक्के स्थानिक पक्ष्यांच्या प्रजाती तर ५० टक्के स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती आहे. यापैकी मलबारी राखी धनेश हा पक्षी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय परिसरात दिसतो. तर मुग्धबलाक आणि तिरंदाज या दोन्ही पक्ष्यांचे भांडुप पम्पिंग स्टेशनला दर्शन होते. मुग्धबालक यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातच महाराष्ट्र निसर्ग उद्यानाला येऊन गेला. उद्यानातील कार्यक्रम अधिकारी नीती वारखंडकर यांनी हा पक्षी पाहिला. त्याअगोदर तिरंदाज आणि मलबारी राखी धनेश या पक्ष्यांनी जानेवारी-डिसेंबर महिन्यात उद्यानाला भेट दिली होती. उद्यानाचे साहाय्यक कार्यक्रम अधिकारी तुषार पाटील यांनी या दोन्ही पक्ष्यांना उद्यानात पाहिले.
( हेही वाचा : महाशिवरात्रीनिमित्त शंकराला बेलपत्र वाहणार असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा! )
३७ एकर जागेतील विस्तीर्ण भागांत शहराच्या मध्यभागी वसलेल्या मानवनिर्मित जंगलात सध्या ५००हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. तर ८५ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आहेत.
Join Our WhatsApp Community