मुंबईतील बिबट्यांचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाने सुरु केलेल्या रेडिओ कॉलरिंग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तिस-या बिबट्याची निवड करण्यात आली आहे. सी ३३ या आरेतील दोन वर्षांच्या मादी बिबट्याला रेडिओ कॉलर लावण्याचा निर्णय झाल्याची खात्रीलायक माहिती वनविभागाच्या अधिका-यांनी दिली. सी ३३ ही आरेत नऊ माणसांवर हल्ले करणा-या मादी बिबट्याची (सी ३२) बहीण आहे. रेडिओ कॉलरिंगच्या दुस-या टप्प्याची सुरुवात सी ३३ या मादी बिबट्यापासून होईल.
सी ३२, सी ३३ बहिणी
आरेतील माणसांवर हल्ले करणा-या सी ३२ या मादी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. या पिंज-यामध्ये सी ३३ अडकली. तिची रवानगी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली. मात्र तपासाअंती पकडलेली मादी बिबट्या ही सी ३३ असल्याचे निष्पन्न झाले. आईपासून विभक्त झाल्यानंतर या दोन्ही बहिणी एकत्र फिरत असल्याचे वनविभागाने आरेत वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या कॅमेरामध्ये दिसून आले होते. सी ३३ ही स्वभावाने आपली बहिण सी ३२ सारखी नाही. त्यामुळे तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे ठरले आहे. परंतु पुन्हा जंगलात गेल्यानंतर तिच्या हालचालींवर लक्ष ठेवणेही गरजेचे असल्याने रॅडिओ कॉलरिंग करण्याचे ठरले, असी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
(हेही वाचा : अरेव्वा! मुंबईकरांची मोठ्या आवाजाच्या फटाक्यांकडे पाठ!)
रेडिओ कॉलर झालेले पहिले दोन बिबटे
फेब्रुवारी २०२१ पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुक्त संचार करणा-या सावित्री आणि महाराजा या मादी आणि नर बिबट्यांना रॅडिओ कॉलर केले गेले. पहिल्या टप्प्यांत केवळ दोन बिबट्यांना रॅडिओ कॉलर केले गेले.
निधी रखडला?
पाच बिबट्यांवर रेडिओ कॉलर करण्याचे वनविभागाने रॅडिओ कॉलरिंग प्रकल्पाची घोषणा करताना स्पष्ट केले होते. दोन बिबटे पहिल्या टप्प्यात तर दुस-या टप्प्यात तीन बिबट्यांलर रेडिओ कॉलरिंग करण्याचे ठरले. परंतु आतापर्यंत दुस-या टप्प्यासाठी रेडिओ कॉलर्स अद्याप आलेले नसल्यचे सूत्रांचे म्हणणे आहे.
डिसेंबर महिन्यात रेडिओ कॉलरिंग?
दुस-या टप्प्यातील रेडिओ कॉलरिंगची सुरुवात नोव्हेंबर महिन्यात होणार होती. मात्र डिसेंबर महिन्यात दुस-या टप्प्यातील सी ३३ वर रेडिओ कॉलर लावले जाईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘रेडिओ कॉलर’ म्हणजे काय?
वन्यजीवांची ‘इकोलॉजी’, त्यांचा भ्रमणमार्ग आणि मानव-प्राणी सहसंबधाचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने ‘रेडिओ कॉलर’ पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यामध्ये प्राण्याच्या गळ्यामध्ये ‘रेडिओ कॉलर’चा पट्टा बसवला जातो. हे रेडिओ कॉलर ’जीएसएम’ किंवा ’सॅटेलाईट’या संपर्क तंत्रज्ञानाच्या पद्धतीद्वारे कार्यान्वित असतात. यामाध्यमातून वन्यजीव संशोधकांना ‘रेडिओ कॉलर’ लावलेल्या प्राण्याचा ठावठिकाणा नेमकेपणाने समजतो आणि हालचालींचा मार्गही उलगडतो. वन्यजीव संशोधकांना बसल्या जागी ‘रेडिओ कॉलर’ लावलेल्या प्राण्याची माहिती जाणून घेण्यामध्ये ’जीएसएम’ किंवा ’सॅटलाईट कॉलर’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
Join Our WhatsApp Community