दुसरे महायुद्ध, मुंबईचा डबेवाला ते ऑनलाइन ऑर्डर; Food वितरण प्रणालीचा रंजक इतिहास

आधुनिक तंत्रज्ञान, विविध अ‍ॅप्स यामुळे सामान्य माणसाचे जीवन अगदी सोयीस्कर झाले आहे. सरकारी कामे सुद्धा आपल्याला घरबसल्या करता येतात. अलिकडे स्वत:ला Explore करण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट आपल्याला घरबसल्या कशी मिळेल आणि आपला वेळ कसा वाचेल याचा विचार करतात. म्हणूनच हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाण्याकरता Once in a blue Moon उजाडू लागला आणि ऑनलाईन होम डिलिव्हरी ही संकल्पना भारतीयांनी अंगीकारली. झोमॅटो (zomato), स्विगी ( Swiggy), उबेर इट्स (uber eats) इत्यादी अ‍ॅपद्वारे आपण अगदी सकाळच्या चहा-कॉफीपासून, मिडनाईट क्रेव्हिंग झाल्यास मध्यरात्री ३ वाजता सुद्धा आपण या अ‍ॅप्सवरून आवडीचे पदार्थ ऑर्डर करू शकतो. आताच्या घडीला ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे ( Online Food Delivery) जाळे संपूर्ण जगभरात पसरले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का फूड डिलिव्हरी ही संकल्पना एकविसाव्या शतकातील नसून याला मोठा इतिहास आहे. काळानुसार फूड डिलिव्हरीमध्ये कसे बदल झाले, याविषयी जाणून घेऊया…

( हेही वाचा : ‘बेस्ट’ इलेक्ट्रिक बसच्या निविदेचा वाद; टाटा मोटर्सच्या याचिकेवरील निकाल राखीव)

प्राचीन रोम

इतिहासकारांच्या मते प्राचीन रोम शहरात नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार जेवण सर्व्ह करण्यासाठी काउंटरवर मोठ्या मातीच्या भांड्यांमधून जेवण सर्व्ह करण्यात येत होते. अशा पद्धतीने जेवण सर्व्ह करण्याच्या पद्धतीला त्याकाळी थर्मोपोलियम असे म्हटले जायचे. पोंपेईमध्ये ( Pompeii) हे काउंटर तयार करण्यात आले होते.

दूध वितरण पद्धती ( Door to Door Milk delivery) इ.स.१७८५

सर्वप्रथम अमेरिकेमध्ये दूध वितरण पद्धती इ.स. १७८५ मध्ये सुरू झाली. त्याकाळी फ्रिज वापरला जात नव्हता आणि दूध नाशवंत असल्यामुळे दैनंदिन दूधाचे वितरण ही काळाची गरज होती. भारतात सुद्धा अशाप्रकारे दूध रोजच्या रोज गावोगावी जाऊन वितरित केले जायचे.

राजा हंबरटो आणि राणी मार्गेरिटा ( १८८९)

मार्गेरिटा पिझ्झा सर्वांनाच आवडतो. राजा हंबरटो आणि राणी मार्गेरिटा फ्रेंच पदार्थ खाऊन कंटाळले यानंतर त्यांनी रॉफेल एस्पिओसिटो या स्वयंपाकीला बोलावून घेतले त्याने उभयतांसाठी इटली देशाच्या झेंडाच्या रंगाप्रमाणे लाल रंग टोमॅटोचा, पांढरा रंगाचे मोझेरेला चीझ, हिरव्या रंगाची तुळस या साहित्याचा वापर करून पिझ्झा बनवला हा पदार्थ राणीला आवडला यानंतर या पिझ्झाचे मार्गेरिटा असे नामकरण करण्यात आले यानंतर मात्र या पिझ्झाचे घरोघरी वितरण करण्यात आले होते.

मुंबईचा डब्बेवाला ( 1890)

मुंबईच्या डब्बेवाल्यांना जवळपास १२५ वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटीश कालखंडात मुंबईसारख्या व्यस्त महानगरात जेवण वितरण प्रणाली विकसित करण्यात आली. कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता महादेव हवाजी बाचे यांनी १०० लोकांना घेऊन दुपारचे जेवण वितरित करण्यास सुरुवात केली. आताच्या घडीला सुमारे ५ हजार डब्बेवाले २ लाख डब्बे वितरीत करतात. मुंबईच्या डब्बेवाल्यांचे जागतिक पातळीवर कौतुक झाले आहे. आता डबेवाले सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डब्यांचे वितरण करू लागले आहेत.

दुसरे महायुद्ध

दुसऱ्या महायुद्धाला सुरूवात झाल्यानंतर लंडनमध्ये लोक घराबाहेर पडत नव्हते. यावेळी तेथील सरकारने जेवण वितरण करण्यासाठी शेफ आणि स्वयंसेवकांची नेमणूक केली. ही संकल्पना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अत्यंत लोकप्रिय झाली अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांमध्येही याच पद्धतीने नागरिकांना सेवा देण्यास सुरूवात करण्यात आली. युद्ध संपल्यावर युद्धावरून परतलेल्या सैनिकांना इटालियन फूडची सवय झाली होती यानंतर पिझ्झा होम डिलिव्हरी संकल्पाना रूढ झाली.

फूड ट्रक

दुसरे महायुद्ध संपल्यावर १९६० पासून कार्यालांच्या ठिकाणी नागरिकांना फूड ट्रकद्वारे जेवणाचे वितरण केले जाऊ लागले. फूड ट्रक संपूर्ण शहरात जेवण वितरण करत असे. यानंतर १९९० मध्ये जागतिकीकरणाला सुरूवात झाली आणि हळूहळू आधुनिक तंत्रज्ञान विकसित होऊ लागले.

ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅप्स

१९९५ मध्ये वर्ल्ड वाइड वेटर या ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिसची सुरूवात कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आली. यानंतर मधल्या काळात अनेक ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिसेस सुरू होत्या. २०१० मध्ये झोमॅटो लॉंच करण्यात आले परंतु स्मार्टफोनवरील अ‍ॅप्सद्वारे फूड ऑर्डर करण्याची संकल्पना जवळपास २०१५ पासून लोकप्रिय झाली. यानंतर Food Delivery क्षेत्रात झोमॅटो (Zomato),स्विगी (Swiggy), Uber eats या अनेक कंपन्या सहभागी झाल्या. अगदी मॅकडोनाल्ड, डोमिनोज या कंपन्यांनी सुद्धा स्वत:चे फूड डिलिव्हरी अ‍ॅप विकसित केले आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे महत्त्व लोकांना प्रामुख्याने कोरोना लॉकडाऊन काळात समजले कारण या दोन वर्षाच्या काळात जेवण वितरण करणारे हे अ‍ॅप्स घरगुती अत्यावश्यक सामान सामान्य नागरिकांना घरपोच पोहोचू लागले. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात या खासगी अ‍ॅप्सचा सुद्धा मोठ्या प्रमाणात हातभार लागला.

अ‍ॅप्सला आले subscription

झोमॅटो, स्विगी यासारख्या अ‍ॅप्सवर आता सबस्क्रिप्शन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वर्षभराचे सबस्क्रिप्शन तुम्ही विकत घेतल्यास तुम्हाला डिलिव्हरी चार्ज लागत नाही आणि तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष हॉटेलमध्ये जाता तेव्हा तेथेही तुम्हाला सवलत मिळते.

अशाप्रकारे काळानुसार फूड डिलिव्हरीच्या मूळ संकल्पनेत अनेक बदल झाले असले तरीही, लोकांना वेळेवर जेवण मिळावे, कोणीही उपाशी राहू नये हा उद्देश कायम आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here