‘या’ ठिकाणी पितृपक्षात साजरा होतोय गणेशोत्सव!

पेण, उरण आणि पनवेलमधील आगरी समाजात प्रामुख्याने साखरचौथ गौरा गणेशोत्सव साजरा केला जातो.

गणेश चतुर्थीला बाप्पा आले आणि अनंत चतुर्दशीला विसर्जित झाले, पण आम्ही आज तुम्हाला या सर्व परंपरेला छेद देणारी आगळी वेगळी परंपरा सांगणार आहोत, ती म्हणजे गौरा गणपती! आता तुम्ही म्हणाल गणेशोत्सव संपला पुन्हा गणेशोत्सव कुठला? तर तसे नाही! रायगड जिल्ह्यात उरण – पनवेल या भागात पितृपक्षात ठिकठिकाणी गौरा गणपतीच्या नावाने गणेशोत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची प्रथा आहे. काही ठिकाणी अडीच दिवस, काही ठिकाणी ५ तर काही ठिकाणी ११ दिवसांचा गणपती बसवला जातो. पेण, उरण आणि पनवेलमधील आगरी समाजात प्रामुख्याने साखरचौथ गौरा गणेशोत्सव साजरा केला जातो.

फक्त उरण-पनवेलमध्येच साजरा होतो गणेशोत्सव!

पितृपक्षात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गौरा गणपती नावाने गणेशोत्सव सुरु होतो. काही ठिकाणी हा गणपती घरगुती गणपती म्हणून बसवतात, तर काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून साजरा करतात. यात काही ठिकाणी अडीच दिवसांचा गणपती बसवतात, तर काही ठिकाणी ५ आणि काही ठिकाणी ११ दिवसांचे गणपती बसवले जातात. अशा प्रकारचा गणेशोत्सव केवळ रायगड जिल्ह्यातील उरण आणि पनवेल या भागातच साजरा केला जातो. अनेक जण नवसाचा म्हणून हा गणपती बसवतात, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे हा गणेशोत्सव गणेश चतुर्थीप्रमाणेच मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. त्यावेळी सामाजिक उपक्रम राबवले जातात, तर काही ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते.

(हेही वाचा : सिद्धूचा पंजाब अध्यक्षपदाचा राजीनामा! काँग्रेसची माघार की सिद्धूची खेळी?)

धुमधडाक्यात साजरा होतोय गणेशोत्सव! 

गौरा गणपती हा गणेश चतुर्थीप्रमाणेच मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो, त्यासाठी आकर्षक रोषणाई केली जाते, सुंदर देखावे तयार केले जातात, नियमितपणे पूजा-अर्चा होते, इतकेच नाही तर सत्यनारायणाची पूजाही घातली जाते, आगमन असो कि विसर्जन वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. यंदा कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू आहेत. तरीही ठिकठिकाणी अधिकाधिक उत्साहात हा गणेशोत्सव साजरा होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here