कोकणात कृषी महोत्सव! शेतकऱ्यांना ‘या’ विषयांवर केले जाणार मार्गदर्शन

172

दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या वतीने वर्षभर शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने सुवर्ण पालवी या नावीन्यपूर्ण कृषी महोत्सवाचे आयोजन 13 ते 17 मे 2022 रोजी करण्यात येणार आहे. या कृषी महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

( हेही वाचा : कल्याणमध्ये मध्य रेल्वे विस्कळीत! रेल्वे रूळ तुटला )

शेतकऱ्यांशी समन्वय व कोकणच्या शेती प्रगती संदर्भात चर्चा

कोकण कृषी महोत्सवामध्ये ५०० पेक्षा जास्त स्टॉल्स असणार असून २०० एकर परिसरावर शिवार फेरी आयोजित करण्यात येणार आहे. कृषी तंत्रज्ञानाविषयी जागरूकता, कृषी विद्यापीठाचे आजपर्यंतचे संशोधन, शासकीय योजनांची माहिती, शेतकरी उत्पादन विक्री व्यवस्था, विद्यापीठ व इतर संस्थांचा शेतकऱ्यांशी समन्वय व कोकणच्या शेती प्रगती संदर्भात चर्चा असा या सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाचा उद्देश असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तसेच समारोपप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले जाणार आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यातील कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञानाशी निगडीत सर्व संस्था यांची दालने देखील या महोत्सवात असणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना याविषयी मार्गदर्शन

या कृषी महोत्सवामध्ये रान भाज्या, शेडनेट, भात संशोधन, पशुसंवर्धन तंत्रज्ञान यासोबतच विविध विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यासंदर्भात निर्देश भुसे यांनी दिले. तसेच पुष्प प्रदर्शन, महिला शेतकरी मेळावा, गोड्या पाण्यातील मत्स्य पालन, नाचणी व बांबू शेती आदींचा समावेश कृषी महोत्सव मध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कृषी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आलेले कार्य सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही चांगली संधी असून या कृषी महोत्सवाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.

या प्रदर्शनामध्ये राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे, शासनाचे कृषी व विकास विभाग, महामंडळे व सहकारी संस्था, कृषी उद्योजक, कृषी निविष्ठांची निगडित मत्स्य संस्था, मत्स्य निविष्ठा उत्पादक, महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देखील मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संचालक विस्तार व शिक्षण डॉ. संजय भावे, डॉ. प्रमोद सावंत, डॉ. अजय राणे, डॉ. मंदार खानविलकर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.