डुडलमध्ये झळकणारे कोण आहेत शिवाजी गणेशन?

१९२८ सालामध्ये तामिळनाडूमध्ये शिवाजी यांचा जन्म झाला होता. गणशेमूर्ती हे त्यांचे मूळ नाव आहे.

गुगल काही महत्वाच्या दिवशी किंवा महत्वाच्या व्यक्तींच्या स्मरणार्थ डुडल बनवतं असतं. आज गुगलने शिवाजी गणेशन यांच्या ९३व्या जयंतीनिमित्ताने एक खास डुडल तयार करत मानवंदना दिली आहे. आज गुगुल डुडलवर झळकणारी ही भारतीय व्यक्ती नेमकी  कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज डुडलमध्ये दिसणारी व्यक्ती शिवाजी गणेशन तामिळ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते. दिवंगत अभिनेते शिवाजी गणेशन यांना एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीतील मार्लन ब्रॅंडो म्हटलं जात असे. बंगळूरमधील कलाकार नुपूर राजेश चोकसी यांनी हे खास डुडल तयार केलं आहे.

का करु लागले ‘शिवाजी’ या नावाने कामं?

१९२८ सालामध्ये तामिळनाडूमध्ये शिवाजी यांचा जन्म झाला होता. गणशेमूर्ती हे त्यांच मूळ नाव आहे. अभिनयात करिअर करण्यासाठी अवघ्या सात वर्षांचे असताना त्यांनी घर सोडलं आणि ते एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाले. सुरुवातीला बाल कलाकार आणि महिला कलाकाराच्या भूमिका त्यांनी साकारल्या. १९४५ सालामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत “शिवाजी कांडा हिंदू राज्यम” या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. लोक त्यांना ‘शिवाजी’ नावाने ओळखू लागले आणि त्यानंतर गणेशन यांनी शिवाजी नावानेच अभिनय क्षेत्रातून प्रेक्षकांची मनं जिंकली.

अष्टपैलू व्यक्तीमत्व

१९५२ सालामध्ये आलेल्य ‘पराशक्ति’ या सिनेमातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. शिवाजी गणेशन यांनी जवळपास ३०० सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतील विविध सिनेमांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. लांबलचक संवाद आणि भारतीय पौराणिक ग्रंथांची जाण असलेले अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. यासोबतच गणेशन यांनी भरतनाट्यम, कथ्थक आणि मणिपुरी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. करिअरच्या सुरुवातीच्या काळात गणेशन यांनी काही नकारात्मक भूमिका देखील साकारल्या. या भूमिकादेखील लक्षवेधी ठरल्या.

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळवणारे पहिले अभिनेते

शिवाजी गणेशन यांचा १९६१ सालामध्ये आलेला ‘पसमालर’ हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतील सुपरहिट ठरलेला सिनेमा होता. तर १९६४ सालामध्ये आलेला ‘नवरथी’ हा त्यांचा १००वा सिनेमा असून यात त्यांनी नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. १९६० सालामध्ये गणशेन यांना त्यांच्या “वीरपांडिया कट्टाबोम्मन” या सिनेमासाठी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय अभिनेते ठरले. तसेच अभिनयाच्या पाच वर्षांच्या कारकिर्दित त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. लॉस एंजिल्स टाइम्सने गणेशन यांना मार्लन ब्रँडो ही उपाधी दिली होती.

का बनवलं जातं डुडल?

एखाद्या महत्वाच्या दिवसाबद्दल किंवा महत्वाच्या व्यक्तीच्या स्मरणार्थ गुगलकडून डुडल बनवलं जात. या विशेष व्यक्तींबद्दल लोकांना माहिती मिळावी हा यामागचा उद्देश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here