कोकण किनाऱ्यावर झाले दुर्मिळ कासवांच्या पिल्लांचे दर्शन!

165

कोकणच्या समृद्ध किनारपट्टीला शनिवारी ग्रीन सी टर्टल प्रजातीच्या कासवांच्या पिल्लांचे दर्शन झाले. राज्यात पहिल्यांदाच ग्रीन सी कासवाने अंडी घातल्यानंतर तब्बल ५५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तब्बल ७४ अंड्यांतून कासवांची पिल्ले बाहेर आली. कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबाग समुद्रकिना-यावरील स्थानिकांना हे विहंगम दृश्य पाहताना आनंद गगनात मावेनासा झाला.

११ जानेवारी रोजी ग्रीन सी टर्टलने देवबाग समुद्रकिना-याला भेट देत तिथे अंडी टाकली. याबाबत स्थानिक मच्छिमारांकडून वनविभागाच्या कांदळवनकक्षाला माहिती मिळाली. याबाबतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर वन्यजीव जीवशास्त्रज्ञ नुपूर काळे यांनी राज्यात पहिल्यांदाच ग्रीन सी टर्टल प्रजातीच्या कासवाने घरटे घातल्याची नोंद दिली. कोकणच्या समुद्रात ग्रीन सी टर्टल प्रजातीचे कासव दिसणे सर्वसामान्य असले तरीही त्यांनी समुद्रकिना-याला भेट देत अंडी घातल्याची नोंद नव्हती. ही नोंद मिळताच वन्यजीवप्रेमींच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यामुळे पुढील ५५ दिवसांची उत्कंठा वनविभाग, स्थानिक मच्छिमार आणि वन्यजीवप्रेमींनाही होती.

(हेही वाचा – मुंबईतील पुलांचेही सौंदर्य खुलणार, असा होणार मेकअप!)

इवल्याश्या पावलांनी समुद्राचा रस्ता धरला

या अंड्यांची काळजी घेण्याची जबाबदारी किनारपट्टीवरील स्थानिकांनी उचलली. अंडी फुटून पिल्ले बाहेर येण्याची वेळ जवळ येत असल्याने कांदळवन वनविभागाच्या अधिका-यांनी तसेच कांदळवन प्रतिष्ठानच्या संशोधकांनीही अगोदरच आपला मोर्चा देवबाग समुद्रकिना-याकडे वळवला होता. अखेर शनिवारी सकाळी ग्रीन सी टर्टलचे पहिले पिल्लू अंड्याबाहेर येत वाळूतून बाहेर आले. पिल्लाने आपल्या इवल्याश्या पावलांनी समुद्राचा रस्ता धरला. हा क्षण डोळ्यांत टिपताना संशोधकांच्या, तसेच अंडी सांभाळणा-यांची जबाबदारी पेलणा-यालाही समाधान दाटून आले.

एकूण ७४ अंड्यातून ग्रीन सी टर्टल प्रजातीच्या कासवांची पिल्ले बाहेर आली. ३ अंडी नैसर्गिकरित्या खराब झाली. या प्रजातीच्या कासवाने राज्याच्या समुद्रकिना-यावर अंडी घातल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने पिल्ले जन्मल्याची ही पहिलीच नोंद आहे.

– हर्षल कर्वे, सागरी जीवशास्त्रज्ञ , कांदळवन फाऊंडेशन

ग्रीन सी टर्टलबद्दल

  • पश्चिम किनारपट्टीत गुजरात किनारपट्टीवर ग्रीन सी टर्टल अंडी घालतात. महाराष्ट्रात दक्षिण कोकणातील समुद्रात ग्रीन सी टर्टल पाहायला मिळतात. पालघरच्या समुद्रातही ग्रीन सी टर्टल आढळले आहेत. मात्र राज्यात ग्रीन सी टर्टल प्रजातीच्या कासवांच्या घरट्यांची तसेच पिल्लांची नोंद नव्हती.
  • ग्रीन सी टर्टल ही कासवाची प्रजाती इंटरनॅशनल यूनियन फॉर कॉन्झर्वेशन फॉर नॅचर या आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेकडून संकटग्रस्त म्हणून घोषित झाली आहे. ही प्रजाती प्रामुख्याने अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरात आढळते. हिंदी महासागरातही या कासवाचे दर्शन होते.
  • या कासवाचे वयोमान ९० वर्षांचे आहे
  • जगभरात किनारपट्टी भागांतील वाढत्या बांधकामामुळे ग्रीन सी टर्टलचे घरटे किनारपट्टीपासून दूरापास्त झाल्याचे बोलले जाते. तसेच पाण्यातील प्रदूषणाचा फटकाही या कासवाला बसतोय. कित्येकदा ग्रीन सी टर्टल मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून पंखे तूटून, गंभीर जखमांमुळे मृत्यू पावतात. काही देशांतील स्थानिक लोकांमध्ये ग्रीन सी कासवाच्या अंडी जेवणात वापरली जातात. त्यामुळे या कासवाला इंटरनॅशनल यूनियन फॉर कॉन्झर्वेशन फॉर नेचरकडून संकटग्रस्त घोषित करण्यात आले आहे.

संकटग्रस्त घोषित होण्यामागील कारण 

जगभरात समुद्रानजीकच्या किनारपट्टीवरील वाढता मानवी हस्तक्षेप ग्रीन सी टर्टल कासवांना किनारपट्टीपासून दूर नेत आहे. वाढत्या जलप्रदूषणामुळेही या कासवाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. कित्येकदा ग्रीन सी टर्टल मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून पंखे तुटून किंवा जहाजाच्या धडकेत गंभीर जखमा होत मृत्यू पावतात. काही देशांत ग्रीन सी टर्टलही अंडी जेवणात वापरली जातात. त्यामुळे या कासवाला युनियन फॉर कॉन्झर्वेशन फॉर नेचरकडून संकटग्रस्त घोषित करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.