नववर्ष स्वागतयात्रा म्हटले की डोंबिवलीची आठवण येतेच. गुढीपाडव्याला निघणारी शोभायात्रा ही डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख आहे. डोंबिवलीतूनच मराठी नववर्षाच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्याची परंपरा सुरु झाली होती. मात्र कोरोनामुळे गेली दोन वर्षे डोंबिवलीत स्वागतयात्रा निघाली नव्हती. पण सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यंदा डोंबिवलीतून ही यात्रा निघणार आहे.
यात्रेचा मार्ग
डोंबिवली पश्चिम महावैष्णव मारुती मंदिरात सकाळी साडेसहा वाजता पूजा करून कोविड योद्ध्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर सात वाजता नववर्ष स्वागतयात्रेची सुरुवात होणार आहे. ही पालखी पंडित दिनदयाळ मार्ग, व्दारका चौक, रेल्वे पूल मार्गे आई बंगला, शिवमंदीर रोड, राजेंद्र प्रसाद रोड, चार रस्ता, मानपाडा रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बाजी प्रभू चौक, फडके रोड मार्गे आप्पा दातार चौक या मार्गांतून निघणार आहे.
यात्रेतून एकात्मता दाखवण्याचा प्रयत्न
या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत चित्ररथांचा समावेश करण्यात आलेला नाही,अशी माहिती श्री गणेश संस्थानचे विश्वस्त प्रविण दुधे यांनी दिली. यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होणार असल्याने, संस्कारभारतीच्या रांगोळीची थिम असणार आहे. या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त राष्ट्रीय एकात्मता दाखवण्यासाठी काही वृत्तसंस्थांच्या लोकांना घेऊन वेशभूषेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वातावरण निर्मिती करण्यासाठी ढोलपथकही असणार आहे. तसेच, या शोभायात्रेत जे भाविक उत्सफूर्तपणे सहभागी होणार आहेत त्यांना घेऊन ही नववर्ष स्वागतयात्रा निघणार असल्याचे प्रविण दुधे यांनी सांगितले.
म्हणून यंदा चौकाचौकात ढोलपथक
ढोलपथकांचा यंदाच्या शोभायात्रेत समावेश न करता यावर्षी ते चौकाचौकात असणार आहेत. ढोलपथक यात्रेत असल्याने यात्रेत खंड पडतो तसेच नागरिकांनाही आवाजाचा त्रास नको म्हणून यंदा काही ठराविक ठिकाणीच ढोलपथकांना वाजवण्याची मुभा देण्यात आल्याचे प्रविण दुधे यांनी सांगितले.
( हेही वाचा: चीन- पाकिस्तानला मागे टाकत महाराष्ट्राने पटकावले अव्वल स्थान! )
कोविड योद्ध्यांचा केला जाणार सत्कार
दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाशी झगडत असाताना, डोंबिवलीतील कोरोना योद्ध्यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले. अशा काही जणांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार केला जाणार आहे. तसेच, पालखीचा मान या कोरोना योद्ध्यांपैकी काही जणांना दिला जाणार आहे. यात पोलीस विभागातील काही कर्मचारी, आरोग्य विभाग, अॅम्बूलन्स चालक, तसेच, डोंबिवली परिसरात असणा-या तीन स्मशानभूमितील अग्नी देणा-या कर्मचा-यांचाही यावेळी सन्मान केला जाणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवस कोरोना लसीकरण शिबीर ठेवण्यात आले आहे. येणा-या लोकांना कोरोनाचा पहिला, दुसरा आणि बूस्टर डोसही दिला जाणार आहे. तसेच रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community