हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व

102

हिंदु धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व याविषयीचे शास्त्रीय विवेचन सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात केले आहे.

( हेही वाचा : ‘ही’ चूक तुम्ही करू नका… कारण थेट दाखल होईल आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा! )

गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा !

१. तिथी : युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा

२. वर्षारंभ : चैत्र शुद्ध प्रतिपदाच का ? : याचा प्रथम उद्गाता ‘वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः।’ असे वेदात म्हटले आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभ दिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. आज सर्वजण साजरा करत असलेल्या १ जानेवारीला वर्षारंभ का, याला शास्त्रीय आधार नाही. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.

गुढीपाडवा : नैसर्गिक महत्त्व 

वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व 

रामाने वालीचा वध केल्याचा दिवस : रामाने वालीचा वध या दिवशी केला. ज्या दिवशी राम रावणवधानंतर आयोध्येला परत आला, त्या दिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.

शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस ! : शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.

ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.

गुढीपाडवा : आध्यात्मिक महत्त्व 

सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : ‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडवा या दिवशी सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल, तर ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर सुरू होणार्या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारी हा नव्हे, तर गुढीपाडवा हाच नववर्षारंभ साजरा करण्यात आपले खरे हित आहे. नव्या वर्षाचा प्रारंभ मंगलदायी व्हावा, यासाठी शास्त्र समजून घेऊन भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर आणि फायदेशीर आहे.

३. गुढीपाडवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक : गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

४. प्रत्येक पाऊल समृद्धीकरता पुढे टाकण्याची शिकवण देणारी चैत्र शुक्ल प्रतिपदा ! : उत्तरायणातील वसंतऋतूतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शुभसंकल्पाची गुढी उभारायची असते. गुढीपाडवा हे संकल्पशक्तीचे गुढत्व दर्शवते. ‘आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धीकरिता आता पुढेच पडत राहील’, असे प्रतिप्रदा सांगते; म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास, तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. याकरिताच सत्यसंकल्परूपी गुढीची मुहूर्तमेढ रोवायची असते. – परात्पर गुरु परशराम माधव पांडे महाराज

५. पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश – शिमग्याच्या काळात भेदभाव टाकून स्वीकारलेली समता फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळे अव्यवस्था निर्माण होते. ही अव्यवस्था संपवून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्यास आरंभ करण्याचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवसापासून पुन्हा देव, ऋषी, पितर, मनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचा, त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा, हाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

अर्थ : पृथ्वीवरील सर्व जीव सुखी आणि निरामय (रोगमुक्त) होवोत. सर्वांचे कल्याण होवो. सर्वांची एकमेकांकडे पहाण्याची दृष्टी शुभ आणि कल्याणमय असो आणि कोणाच्याही वाटेला दुःख न येवो.

तेव्हा वर वर्णन केल्याप्रमाणे या गुढीपाडव्याच्या दिवशी सत्य संकल्पाची, तो प्रत्यक्षात यावी; म्हणून कृतीशील भक्तीसाठी मूर्त स्वरूप अशा गुढीची मुहूर्तमेढ आनंदाने करून म्हणूया,

‘ॐ शांति: शांति: शांति: ।’

हे नववर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि आनंदाचे जावो, ही प्रभुचरणी हार्दिक सदिच्छा !’

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’ 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.