देशातील बहुचर्चित पद्म पुरस्कार वितरण सोहळा राजधानी दिल्लीत पार पडला. कर्नाटकातील मंगळुरू येथील हरेकला हजब्बा या ६८ वर्षीय फळ विक्रेत्याने आपल्या रोजच्या १५० रुपयांच्या कमाईतून प्राथमिक शाळा बांधली. या अथक प्रयत्नांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून हरेकला हजब्बा यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्रीने गौरवण्यात आले.
अशिक्षित पण शिक्षणात घडवली क्रांती
मंगळुरु बस डेपोमध्ये १९७७ पासून संत्री विकणारे हजब्बा अशिक्षित आहेत आणि ते कधीही शाळेत गेले नाहीत. १९७८ मध्ये एका परदेशी व्यक्तीने त्यांना संत्र्याची किंमत विचारली तेव्हा हजब्बा त्या व्यक्तीला मदत करू शकले नाहीत. यामुळे प्रत्येकाने शिक्षण घ्यावे या प्रेरणेने त्यांच्या गावात शिक्षणात क्रांती घडवून आणण्याची इच्छा त्यांच्या मनात आली. त्यांनी गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला. या शाळेत सध्या १७५ वंचित विद्यार्थी आहेत.
(हेही वाचा – आपले नाव मतदार यादीत आहे का? ‘किऑस्क’वर जाऊन पहा)
आयुष्यातील सर्व बचत गुंतवली
२००० मध्ये, हरेकला हजब्बा यांनी त्यांच्या गावात शाळा सुरू करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील सर्व बचत गुंतवली. २०२० मध्ये जेव्हा सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्त्यांपैकी एक म्हणून नाव दिले तेव्हा त्यांच्या या उदात्त कार्याला मान्यता मिळाली. गेल्या वर्षी कोविड महामारीमुळे पद्म कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे २०२० चे पद्म पुरस्कार यावर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात आले.