राज्यात उष्णतेची लाट, प्रकृती सांभाळा! 

राज्यात सध्या उष्णतेची लाट आल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. एप्रिल-मे या दोन महिन्यात राज्यातील तापमान वाढतच जाणार आहे, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

मागील ४-५ वर्षांपासून जगभरात एकूण तापमानात वाढ होत आहे. दक्षिण आशिया खंडात तर दर वर्षी तापमानात वाढ होत राहणार आहे. त्याचा परिणाम भारतातही होऊ लागला आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तर एप्रिल आणि मे हे दोन महिने राजस्थान, गुजरात येथून महाराष्ट्राच्या दिशेने उष्ण वाहू लागतात, त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण  वाढते, पण सध्या वाढते शहरीकरण आणि जंगलतोड या कारणामुळे तापमानात अधिक वाढ झाली आहे. म्हणूनच राज्याच्या हवामान खात्याने राज्यात उष्ण वारे ७- ८ एप्रिल हे दोन दिवस सलग वाहणार असल्याने राज्यात उष्णतेची लाट आल्याचे सांगितले आहे.

२७ मार्च तापमानाने गाठलेला उच्चांक!

दरवर्षीप्रमाणे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित मुंबई, ठाणे, नवी मुंबई या महामुंबईच्या वातावरणात तापमान वाढ झाली आहे. २७ मार्च रोजी मुंबईतील तापमानाने उच्चांक  गाठला  होता. या दिवशी राज्यात राज्याच्या बहुतांश भागांत तापमान 40 अंशांच्या पुढे गेले होते. मुंबईत सांताक्रुझमध्ये 40.9 अंश तर बोरिवलीत सर्वाधिक 41.3 अंश तापमानाची नोंद झाली होती.

(हेही वाचा : श्रीराम मंदिर निर्माण कार्याचा अवमान! ‘त्या’ धर्मांध मुसलमानाला अटकपूर्व जामीन नाकारला!)

वाढत्या तापमानामागील  कारणे? 

हवामान तज्ज्ञ आणि ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी राज्यात वाढत्या तापमानामागील कारणे स्पष्ट केली. प्रा. चोपणे यांच्या मते, गेल्या ४-५ वर्षांपासून जागतिक पातळीवर तापमान वाढ होत आहे, तसे ते महाराष्ट्रातही होत आहे. जंगलतोड, प्रदूषण आणि शहरीकरण या कारणांमुळे एकूण तापमानात वाढ होत आहे, त्यातच एप्रिल आणि मे या महिन्यात राजस्थान, गुजरातमधून उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने विदर्भ, मराठवाड्यात वाहतात आणि तेथील तापमान वाढते, हे वारे सलग ३-४ दिवस वाहत राहिले आणि ३-४ अंशाने तापमानात वाढ झाली, तर हवामान खाते उष्णतेची लाट म्हणून घोषित करत असते. त्यानुसार राज्यात ७-८ एप्रिल हे दोन दिवस उष्णतेची लाट म्हणून घोषित करण्यात आली आहे.

 1. तापमान कमी करण्यासाठीचे घटक कमी!

मे महिन्याच्या शेवटापर्यंत राज्यातील सरासरी तापमान वाढलेले असणार आहे. जागतिक हवामान विभागानेही दक्षिण आशियातील हवामान दरवर्षी वाढत जाणार आहे, असे म्हटले आहे. त्यानुसार उष्ण लहरींचे प्रमाणही वाढत जाणार आहे. वाढते तापमान आणि उष्ण लहरींचे प्रमाण कमी करण्यासाठी जमिनीवर जे काही घटक लागतात ते आपल्याकडे नाही. पाण्याचे साठे, जंगल हे घटक यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे जमीन तापते आणि रात्रीच्या वेळी ही उष्णता बाहेर फेकली जाते.

2. एप्रिल-मे तापमान वाढलेलेच असणार!

२०१९मध्ये प्रचंड तापमान वाढले होते, २०२० मध्ये अधूनमधून पाऊस पडला होता, त्यामुळे हवामान स्थिर होते, मात्र २०२१ मध्ये पुन्हा तापमानात वाढ होत आहे. म्हणून एप्रिल-मे या दोन महिन्यांत तापमान वाढलेले असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता हे तापमान सरासरी ४० अंशापर्यंत राहणार आहे. जळगाव, मालेगाव, नागपूर, वर्धा ही शहरे आहेत, त्या भागातील तापमान ४७-४८ अंश राहील.

3. मुंबईतील वाढते तापमान ही चिंतेची बाब!

मुंबई ही समुद्रकिनारपट्टीवरील शहर असल्याने या भागातील वातावरण नियंत्रणात राहते, परंतु या शहरातील औद्योगिकरण, कॉंक्रेटीकरण, वाढती वाहन संख्या आणि उष्णतेचे मारक घटक तितकेसे नसणे, या कारणांमुळे मुंबईतील तापमान वाढले आहे. काँक्रीटच्या इमारती, काँक्रीटचे रस्ते पाण्याच्या तुलनेत २ हजारपटीने गरम होतात, त्यामुळे येथील तापमान दिवस-रात्र वाढत आहे. समुद्राकडून दमट वारे वाहत असल्याने येथील तापमान विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे येथील वातावरण ३५-३७ अंश नोंदवले जाणे चिंतेची बाब आहे. ७ एप्रिल रोजी मुंबईतील तापमान कुलाबा वेधशाळेत ३४ आणि सांताक्रूझ तेथे ३६ डिग्री अंश वाढलेले दिसले, ही गंभीर बाब आहे.

(हेही वाचा : ब्रेक दि चेन संदर्भात राज्य शासनाच्या नव्या स्पष्ट सूचना! कसे आहेत नियम?)

मुंबईतील आठवडाभरातील तापमान!

1 एप्रिल – कुलाबा 33 डिग्री, सांताक्रूझ 33 डिग्री
2 एप्रिल – कुलाबा 33, सांताक्रूझ 33
3 एप्रिल – कुलाबा 33, सांताक्रूझ 32
4 एप्रिल – कुलाबा 32, सांताक्रूझ 32
5 एप्रिल – कुलाबा 33, सांताक्रूझ 33
6 एप्रिल – कुलाबा 33,सांताक्रूझ 33
7 एप्रिल- कुलाबा 34, सांताक्रूझ 36

वाढत्या तापमानापासून स्वतःचे असे करा रक्षण! 

 • घराच्या बाहेर जातांना टोपी घाला, स्त्रियांनी दुपट्याच्या सह्याने डोके झाकून घ्यावे
 • कामानिमित्त घराबाहेर जातांना सोबत पाण्याची बाटली घ्यावी
 • उन्हाळ्यात जास्तीतजास्त पाण्याचे सेवन करावे
 • सुर्यकिरणामुळे त्वचा कोरडी पडते, त्यामुळे बाहेर जातांना सनस्क्रीन लोशन वापरावे
 • गरज असल्यास छत्रीचा वापर करावा
 • चहा, कॉफी मद्यपान सेवन करणे टाळावे. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते
 • संत्री, कलिंगड आणि लिंबू यासारख्या रसाळ फळांचे सेवन करा, त्याचे ज्यूस प्यावे
 • जेवण एकाच वेळेला न करता दिवसातून थोड थोड घ्या
 • शक्य असल्यास दुपारी झोप घ्यावी, यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल
 • उन्हाळ्यात शक्यतो मसाल्याच्या पदार्थ टाळावे, तेलकट पदार्थ वर्ज्य करावे. साधे जेवण घ्या
 • बाहेर जाताना भडक रंगाचे कपडे घालू नका, सुती कपडे घाला

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here