रेल्वेतील कागदाचा वापर कमी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यात आले आहे. करंट चार्ट तयार झाल्यानंतर देखील प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणार आहे. ही सुविधा सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, हसन एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस पुणे-नागपूर गरीब रथ, मुंबई-लातूर एक्स्प्रेसमध्ये सुरू होणार आहे. या गाड्यांमधील तिकीट पर्यवेक्षकांना एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिन देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
( हेही वाचा : मुंबई वाहतूक पोलिसांचा ‘नो हॉंकिंग डे’ हॉर्न वाजले, की चलन कापले!)
सीट वाटपात पारदर्शकता
रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या रेल्वे तिकीट परीक्षकांना (टीटीई) कागदावर छापलेला आरक्षण तक्ता बाळगावा लागणार नाही. आरक्षण स्थिती तपासण्यासाठी आणि पुढील आरक्षण स्थितीची माहिती देण्यासाठी सोलापूर विभागात तिकीट पर्यवेक्षकांना १४२ मशिन देणार आहेत. तिकीट तपासण्यासाठी किंवा सीट वाटप करण्यासाठी आता कागदी तक्त्याची गरज भासणार नाही. विभागातील मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी १४२ मशिन वापरण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या मशिन रेल्वे सर्व्हरशी जोडल्या जाणार आहेत. ज्यामध्ये एक 4G सिम कार्ड असणार आहे. याद्वारे तिकीट, सीट संदर्भातील प्रत्येक अपडेट कळण्यास मदत होणार आहे. सोलापूर विभागातून धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेस, हसन एक्स्प्रेस, पुणे-नागपूर गरीब रथ, मुंबई-लातूर एक्स्प्रेसमध्ये पहिल्या टप्यात याची सुविधा सुरू होणार आहे.
एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिनची वैशिष्ट्ये
- रेल्वे सुटल्यानंतर, कोणतेही तिकीट रद्द झाल्यास, पर्यवेक्षकांना माहिती मिळेल.
- रेल्वे सर्व्हरशी मशिन कनेक्ट असेल.
- प्रतीक्षा करणाऱ्यांना निश्चित सीट मिळेल.
- सीट वाटपात पारदर्शकता निर्माण होईल.
- रेल्वेतील पाणी, वीज, अस्वच्छता, बेडरोल, स्वच्छतागृह, आजारी रुग्ण यासंबंधित माहिती नोंदवली जाणार.