देशभरात होळीचा सण उत्साहात! जाणून घ्या, कुठे कशी साजरी झाली धुळवड?

137

देशभरात शुक्रवारी होळीच्या सणाचा उत्साह दिसून आला. लहान मुलांपासून ते विविध क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत सर्वजण होळीच्या रंगात रंगल्याचे दिसून आले. तर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शाळकरी मुलांसोबत होळीचा आनंद लुटला.

विविध भागात होळीचा उत्साह

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी त्यांच्या शिमला येथील निवासस्थानी होळी साजरी केली. यावेळी या उत्सवात असंख्य लोक सहभागी झाले होते. तर सांस्कृतिक केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशमध्येही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज, बनारस आणि मथुरा, वृंदावन सारख्या पौराणिक शहरांमध्ये लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत होळीचा आनंद साजरा केला. यावेळी तरुणांनी संगीताच्या तालावर बेभान होऊन नृत्य केले. यासोबतच आसाममधील गुवाहाटीमध्ये नागरिकांनी गाण्यांच्या तालावर नाचत रंगांची उधळण केली. पाणी पुवठा करण्याच्या टॅंकरध्ये रंग करून टॅंकरच्या पाईपने लोकांवर रंगाचा वर्षाव करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध भागात आज होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

(हेही वाचा – तब्बल ७१ वर्षांपासून ‘या’ गावात होळी, धुळवड खेळतच नाही!)

जावयाची गाढवावरून मिरवणूक काढून धुळवड

राज्यातील बीडमध्ये आजच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. तर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सुरगांव येथे रंगाविना धुळीवंदन सोहळा साजरा केला जातो. येथील नागरिक रंगांची उधळण नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची उधळण करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करीत आहेत.

हैदराबादमध्ये रंग, गुलाल आणि टोमॅटोने होळी

दक्षिण भारतातही होळीचा उत्साह दिसून आला. आंध्र प्रदेश मधील विजयवाड्यात लहान मुलांसह नागरिकांनी रंगांची उधळण करत होळी उत्साहात साजरी केली. तर हैदराबादमध्ये नागरिकांनी रंग, गुलाल आणि टोमॅटोने होळी साजरी केली. यावेळी लोकांनी एकमेकांना टोमॅटो फेकून मारत आनंद साजरा केला.

दुर्गम भागात सैन्याच्या जवानांसोबत होळी

राजस्थानमध्ये पर्यटक आणि स्थानिक लोक रंग आणि गुलाल एकमेकांना लावून होळी खेळतात. हजारो लोकांनी एकत्र येत रंग उधळून होळी साजरी केली. केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील जिल्ह्यातील दुर्गम भागात सैन्याच्या जवानांसोबत स्थानिक लोकांनी नाचून होळी साजरी केली. बोनियार आणि बारामुल्लामध्येही स्थानिक लोकांनी जवानांसोबत होळी साजरी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.